लोकांच्या टोमण्याला कंटाळून जन्मदात्या बापानेच उचलेले टोकच पाऊल!

विजयपूर : कर्नाटक राज्यातून दोन अतिशय धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. कलबुर्गी जिल्ह्यातील इजेरी गावात दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचा विहिरीत संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे, तर दुसरीकडे विजयपूर जिल्ह्यातील नागठाण गावात एका पित्याने केवळ लोकांच्या टोमण्याला कंटाळून स्वतःच्या सहा वर्षांच्या चिमुरड्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोन्ही घटनांनी सामाजिक स्तरावर सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कलबुर्गी जिल्ह्यातील इजेरी गावात शनिवारी सकाळी गावकऱ्यांना विहिरीत दोन मृतदेह तरंगताना दिसले. १६ आणि १७ वर्षांच्या या दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह पाहिल्यावर संपूर्ण गावाला धक्का बसला. विशेष म्हणजे, या दोन्ही मुलींचे हात दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. मुलींची ही अवस्था पाहून त्यांच्या पालकांनी घटनास्थळी एकच आक्रोश केला. जेवरगी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, या प्रकरणाचा तपास विविध अंगांनी सुरू केला आहे.
दुसऱ्या घटनेत विजयपूर जिल्ह्यातील नागठाण येथील मल्लिकार्जुन अरकेरी या पित्याने आपल्या सहा वर्षांच्या मुलाला, सिद्धार्थला, नदीत बुडवून संपवले. गावातील लोक "मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही" असे टोमणे मारून मल्लिकार्जुनला वारंवार सतवत होते. या मानसिक त्रासातून आणि संशयातून त्याने मुलाचा काटा काढण्याचे ठरवले. १६ मार्च रोजी मुलाला शाळेत सोडण्याच्या बहाण्याने त्याने घराबाहेर नेले आणि कराडजवळील वडोली येथील नदीच्या पात्रात त्याला ढकलून दिले. त्यानंतर मुलगा सिंदगी येथील हॉस्टेलमध्ये असल्याचे खोटे सांगून त्याने महिनाभर कुटुंबाची दिशाभूल केली.
या क्रूर कृत्याचा उलगडा मुलाच्या वाढदिवसानिमित्त झाला. १ एप्रिल रोजी मुलगा सिद्धार्थचा वाढदिवस असल्याने त्याची आई भाग्यश्री हिने मुलाला घरी आणण्याचा तगादा लावला. पत्नीचा आग्रह वाढताच मल्लिकार्जुन घर सोडून पळून गेला. पतीच्या संशयास्पद वागण्यामुळे पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मल्लिकार्जुनला ताब्यात घेतले असता त्याने मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. लोकांच्या फुटकळ कमेंट्समुळे एका जन्मदात्यानेच आपल्या पोटच्या गोळ्याचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सध्या दोन्ही प्रकरणांत पोलीस अधिक तपास करत आहेत.