साळावलीसह पाच प्रमुख धरणांतील पाणीसाठा निम्म्यावर आला

पाऊस लांबल्यास तिलारीचे पाणी आमठाणे धरणात सोडणार

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
3 hours ago
साळावलीसह पाच प्रमुख धरणांतील पाणीसाठा निम्म्यावर आला

पणजी: पावसाळ्याला अद्याप ४० दिवसांहून अधिक काळ शिल्लक असतानाच राज्यातील पाच प्रमुख धरणांतील पाणीसाठा निम्म्याहून कमी झाला आहे. जर मान्सूनला यंदा विलंब झाला, तर राज्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. साधारणपणे ७ जूनपर्यंत गोव्यात पावसाचे आगमन होते, त्यामुळे यंदाही पाऊस वेळेत येणे अत्यंत आवश्यक आहे.

पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंजुणे धरणाची पाणीपातळी ३० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे, तर पंचवाडी धरणात ४२ टक्के साठा शिल्लक आहे. याव्यतिरिक्त साळावली धरण ४७ टक्के, तिलारी ४५ टक्के आणि आमठाणे धरणात ४३ टक्के पाणीसाठा आहे. त्या तुलनेत गावणे आणि चापोली धरणांमध्ये सध्या पुरेसा साठा उपलब्ध आहे.

पेयजल विभाग दररोज धरणांतील पाणीपातळीचा आढावा घेत आहे. पावसाळ्यापर्यंत पुरेल इतका साठा सध्या धरणांमध्ये उपलब्ध आहे, अशी माहिती पेयजल विभागाचे मुख्य अभियंता भेंडे यांनी दिली. तसेच, जर पावसाला उशीर झालाच, तर आमठाणे धरणात तिलारीचे पाणी अधिक प्रमाणात सोडण्याची पर्यायी व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.




हेही वाचा