
पणजी : राज्यभरातील कला, वाणिज्य आणि विज्ञान या पारंपरिक शाखांच्या पदवी अभ्यासक्रमांसह बीसीए (BCA) व बीबीए (BBA) या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांचा मोठा ओढा दिसून येत आहे. या सर्व अभ्यासक्रमांसाठी मिळून आतापर्यंत एकूण १५ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. सध्या अर्जांच्या छाननीची प्रक्रिया सुरू असून, ती पूर्ण झाल्यावर प्रथम 'पात्रता यादी' आणि त्यानंतर 'गुणवत्ता यादी' जाहीर केली जाईल, अशी माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे अधिकारी महादेव गावस यांनी दिली.
कला, वाणिज्य, विज्ञान आणि इतर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गेल्या तीन वर्षांपासून मध्यवर्ती समान प्रवेश प्रक्रियेचा अवलंब केला जात आहे. उच्च शिक्षण संचालनालयाच्या 'समर्थ' पोर्टलद्वारे इच्छुकांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करावे लागतात. यंदा बारावीचा निकाल लागल्यानंतर मार्च महिन्यातच अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली होती आणि अर्ज करण्याची मुदत १३ एप्रिल रोजी संपली आहे.
उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्जांची संख्या अधिक असली, तरी अर्ज केलेले सर्वच विद्यार्थी प्रत्यक्षात प्रवेश घेतात असे नाही. विज्ञान शाखेचे अनेक विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा फार्मसी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळतात. या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळाल्यावर ते पदवी विज्ञान अभ्यासक्रमाचे प्रवेश रद्द करतात, यामुळे अनेक जागा रिक्त होतात. याचप्रमाणे कला आणि वाणिज्य शाखेतील काही विद्यार्थी विधी (Law) किंवा बीए-बीएड अभ्यासक्रमांना प्राधान्य देतात. त्यामुळे तिथेही जागा उपलब्ध होतात. तरीही, आवश्यकता भासल्यास प्रत्येक महाविद्यालयातील जागा वाढवून सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, अशी व्यवस्था उच्च शिक्षण संचालनालय करेल, असे आश्वासन महादेव गावस यांनी दिले आहे.