लग्नाच्या बेडीत अडकण्याआधीच सापडला पोलिसांच्या जाळ्यात

कुर्टी-खांडेपार पंचायतीच्या माजी कर्मचाऱ्याकडून लाखोंची अफरातफर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
33 mins ago
लग्नाच्या बेडीत अडकण्याआधीच सापडला पोलिसांच्या जाळ्यात

फोंडा : कुर्टी-खांडेपार पंचायतीच्या एका माजी कर्मचाऱ्याने बनावट स्वाक्षरी आणि शिक्क्यांचा वापर करून लाखो रुपयांची अफरातफर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फोंडा पोलिसांनी संशयित योगेश गावडे (रा. ओपा-खांडेपार) याला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, संशयित विवाहबंधनात अडकण्यापूर्वीच त्याला पोलीस कोठडीची हवा खावी लागल्याने परिसरात याची मोठी चर्चा सुरू आहे.
गेल्या शनिवारी एक महिला उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी पंचायत कार्यालयात आली होती. तिने घरपट्टी भरल्याची ८,५०० रुपयांची पावती सादर केली. मात्र, पंचायतीच्या दप्तरी या रकमेची कोणतीही नोंद नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. ही महिला संशयित योगेशची शेजारीच होती. पावतीवरील सरपंचांची स्वाक्षरी बनावट असल्याचे स्पष्ट होताच पंचायत सचिव आणि सरपंचांनी तातडीने चौकशी केली आणि सोमवारी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२५ मध्येही योगेशने २८,००० रुपयांची बनावट पावती दिल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यावेळी त्याने आपली चूक कबूल केल्याने पोलिसांनी गुन्हा नोंद करण्याऐवजी त्याला नोकरीवरून कमी करण्यात आले होते. मात्र, नोकरी सुटल्यानंतरही त्याने लोकांकडून पैसे घेऊन बनावट पावत्या आणि दाखले देण्याचा गोरखधंदा सुरूच ठेवल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
सरपंच नावेद तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने केवळ पावत्याच नव्हे तर बनावट जन्म दाखलेही तयार करून दिले आहेत. यावर पंचायतीचा बनावट शिक्का आणि सचिवाची खोटी सही आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे बनावट जन्म दाखले पोर्तुगीज पासपोर्ट मिळवण्यासाठी वापरण्यात आले आहेत. संशयिताने बनावट पावती पुस्तकाचाही वापर केला असण्याची शक्यता असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.
राजकीय वरदहस्ताची चर्चा
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताने अशा प्रकारे किती जणांची फसवणूक केली आहे, याचा तपास सुरू आहे. काही वर्षांपूर्वी किर्लपाल पंचायतीतही असाच प्रकार घडला होता. अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई होण्याऐवजी अनेकदा संशयितांना राजकीय आश्रय मिळत असल्याची चर्चा आता नागरिक करत आहेत. 

हेही वाचा