सेंट झेवियरच्या फेस्ताला गोंव्यातील लाखो सनातनी नेमके का जातात ? खट्टरचे वादग्रस्त वक्तव्य

वास्कोत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; वाचा खट्टर नेमके काय म्हणाला

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th April, 01:47 pm
सेंट झेवियरच्या फेस्ताला गोंव्यातील लाखो सनातनी नेमके का जातात ? खट्टरचे वादग्रस्त वक्तव्य

पणजी : गोव्यातील वास्को येथे १८ एप्रिल रोजी आयोजित भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळ्यात एका वक्त्याने सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक विधान केले. या घटनेमुळे राज्यात पुन्हा एकदा धार्मिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली असून सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे.

काय घडले कार्यक्रमात?

सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत, सदर कार्यक्रमात गौतम खट्टर नावाच्या या वक्त्याने सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा उल्लेख अत्यंत खालच्या भाषेत केल्याचे दिसते. त्याने झेवियर यांना 'आतंकवादी' आणि 'बर्बर क्रूर शासक' असे संबोधले. इतकेच नव्हे, तर त्यांच्याबद्दल बोलताना 'त्यांची आत्मा कुठे मिळाली तर सर्वांनी मिळून त्यांना चार जोडे मारले पाहिजेत', असे प्रक्षोभक विधानही केले



त्याने पुढे बोलताना सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या जुने गोवे येथील चर्चमध्ये ठेवलेल्या पार्थिवाबद्दलही आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यांच्या शरिराला किडे लागले असून, आता त्यांचे शरीर किंवा आत्मा काहीही शिल्लक नाही, फक्त हाडांचा चुरा उरला आहे, असे विधान त्याने केले. तसेच, दरवर्षी झेवियर यांच्या सन्मानार्थ होणाऱ्या फेस्ताला लाखोंच्या संख्येने सनातनी लोक का जातात, असा सवालही उपस्थित करत त्याने धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला. गौतम खट्टर याने सेंट फ्रान्सिस झेवियर यांनी आयुष्यभर केवळ धर्मांतराचे काम केले असून अशा 'खोट्या' गोष्टींचा आत्ताच प्रतिकार केला पाहिजे, अन्यथा त्यांच्यामार्फत हा समाज गिळंकृत केला जाईल, असेही त्याने म्हटले. 

आमदार आणि मंत्र्यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह 

वक्तव्य सुरू असताना त्याला कुणीही रोखण्याचा प्रयत्न केला नाही, उलट वक्त्याने मंचावरील आमदारांचे वर्णन 'सज्जन' असे करत, जे 'विधर्मीयांना' साथ देतात त्यांच्यावर टीका केली. कार्यक्रमात 'जय श्री राम'च्या घोषणा देऊन वातावरण अधिक तापवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मंचावरच उपस्थित असलेल्या कुणीतरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केल्याचेही व्हिडिओमध्ये दिसते.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गोव्यातील ख्रिश्चन बांधवांसह सर्वधर्मीय नागरिकांनी या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. अनेकांनी खट्टर विरोधात विविध पोलीस स्थानकांत तक्रारी दाखल केल्या आहेत. धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या अशा वक्तव्यांमुळे गोव्याच्या शांततापूर्ण वातावरणाला धोका निर्माण झाला असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.



दरम्यान सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या गौतम खट्टर याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. वास्को येथील कार्यक्रमात झालेल्या या वादग्रस्त प्रकारानंतर संपूर्ण गोव्यात संतापाचे वातावरण असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्याबाहेरील वक्त्यांनी येथे येऊन राज्यातील धार्मिक सलोखा बिघडेल अशी विधाने करू नयेत. आयोजकांनी अशा कार्यक्रमांचे आयोजन करताना वक्त्यांना आधीच योग्य समज देणे आवश्यक आहे. या प्रकरणी आम्ही एफआयआर नोंदवला असून संशयितावर कडक कारवाई केली जाईल. व्यासपीठावरील आमदारांनी वक्त्याला तिथेच थांबवायला हवे होते, मात्र काहीवेळा तातडीने तसे करणे शक्य होत नाही, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.


हेही वाचा