
पुणे : ‘स्कूल ऑफ केमिकल सायन्स’मधील (School of chemical science) संशोधक डॉ. दीपिका करमळकर (Dr. Deepika G. Karmalkar) यांना शाश्वत ऊर्जेवरील उल्लेखनीय संशोधनासाठी भारत सरकारकडून ‘पंतप्रधान अर्ली करिअर रिसर्च ग्रँट’ (पीएम-इसीआरजी, PM-ECRG) हा प्रतिष्ठित सन्मान जाहीर करण्यात आला आहे. या अंतर्गत त्यांना सुमारे ६० लाख रुपयांचे संशोधन अनुदान मिळणार आहे.
ऊर्जा क्षेत्रात पर्यावरणपूरक व टिकाऊ उपाययोजना विकसित करण्याच्या दृष्टीने डॉ. करमळकर यांचे संशोधन महत्त्वपूर्ण मानले जात आहे. त्यांच्या या कामामुळे भविष्यात स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पीएम-इसीआरजी ही योजना देशातील तरूण व होतकरू संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी राबवली जाते. या माध्यमातून नवकल्पनांना चालना देऊन विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची क्षमता अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे.
डॉ. करमळकर यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत असून, त्यांच्या पुढील संशोधन कार्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोवा विद्यापिठानेही डॉ. करमळकर यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.