इथून चालते व्हा! म्हणत भररस्त्यात महिलेने महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजनांना झापले.

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
2 hours ago
इथून चालते व्हा! म्हणत भररस्त्यात महिलेने महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजनांना झापले.

मुंबई : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपच्या वतीने वरळीत काढण्यात आलेल्या 'जन आक्रोश' मोर्चाला एका संतप्त महिला प्रवाशाच्या रोषाला सामोरे जावे लागले. या आंदोलनामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या या महिलेने थेट महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांनाच सर्वांसमोर खडे बोल सुनावले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला असून, यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

संसदेत महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन अधिनियम) बहुमताअभावी फेटाळले गेल्याच्या निषेधार्थ भाजपने मंगळवारी वरळीतील जांबोरी मैदान ते एनएससीआय डोम असा निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चामुळे वरळी परिसरातील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासनतास वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका महिलेचा संयम सुटला. आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी निघालेली ही महिला गाडीतून उतरली आणि थेट मंत्री गिरीश महाजन जिथे माध्यमांशी बोलत होते, तिथे पोहोचली.

महिलेने अत्यंत संतप्त स्वरात विचारले, "इथून चालते व्हा! तुमच्यामुळे सर्व रस्ते जाम झाले आहेत. तुम्हाला आंदोलन करायचे असेल तर जवळच मैदान आहे, तिथे का जात नाही? सामान्य जनतेला का वेठीस धरताय?" मंत्री गिरीश महाजन यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या महिलेचा संताप कमी झाला नाही. "तुम्हाला समजत नाही का? इथे शेकडो लोक अडकले आहेत," अशा शब्दांत तिने पोलिसांनाही फटकारले.


३३ टक्के महिला आरक्षणाशी संबंधित राज्यघटना दुरुस्ती विधेयक १७ एप्रिल रोजी लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमताअभावी फेटाळले गेले. या पराभवासाठी विरोधी पक्षांना जबाबदार धरत भाजपने मुंबईत हे शक्तिप्रदर्शन आयोजित केले होते. मात्र, ज्या महिलांच्या हक्कासाठी हे आंदोलन होते, त्याच वर्गातील एका महिलेने आंदोलनाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने भाजपची कोंडी झाली आहे. सध्या वरळी परिसरात तणावपूर्ण शांतता असून, या घटनेमुळे आंदोलनांवेळी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा