
पणजी : अरविंद केजरीवाल यांच्या विरोधातील मद्य घोटाळ्याचे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या सुनावणीत न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी या खटल्याचे काम पाहू नये, अशी याचिका आम्ही केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली. या प्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप लागलेला नाही, असे असताना भाजप नेते जणू केजरीवाल दोषीच असल्याचे सांगून लोकांची दिशाभूल करत आहेत. मुळात दादागिरी करण्यामध्ये भाजपच माहीर आहे, अशी टीका 'आप'चे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी केली. बुधवारी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नाईक यांनी सांगितले की, याआधी कनिष्ठ न्यायालयाने केजरीवाल आणि 'आप'च्या इतर नेत्यांवरील हे प्रकरण दाखल करून घेण्यास नकार दिला होता. न्यायालयाने ६०० पानांच्या निवाड्यात सीबीआय अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले होते. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांची दोन मुले वकील असून, ती केजरीवाल यांच्या विरोधात खटला लढणाऱ्या सरकारी वकिलांकडे काम करतात. अशा स्थितीत न्यायमूर्ती शर्मा यांनी या प्रकरणाचे काम पाहू नये, अशी याचिका आम्ही दाखल केली होती. मात्र, त्यांनी ही याचिका फेटाळून लावल्याने आता त्याच या खटल्याचे काम पाहतील.
असे असले तरी, या प्रकरणी न्यायदानाची प्रक्रिया नियमांनुसार पुढे सुरू राहील. मात्र, भाजप नेते केजरीवाल हा खटला जणू हरले आहेत, असेच चित्र उभे करत आहेत. या संदर्भात आमदार दाजी साळकर यांनी केजरीवाल यांच्याबद्दल वापरलेल्या शब्दांचा आम्ही निषेध करतो. कायद्याच्या विरोधात वागणे आणि दादागिरी करणे यात भाजपचा हातखंडा आहे. भाजप नेहमीच न्यायदानाच्या प्रक्रियेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या बाजूने निकाल लागला नाही की नाटके सुरू करतो, अशी टीकाही नाईक यांनी यावेळी केली.