कदंब महामंडळाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार नवीन डिझेल बसेस : उल्हास तुयेकर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
41 mins ago
कदंब महामंडळाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार नवीन डिझेल बसेस : उल्हास तुयेकर

पणजी: गोवा राज्याची जीवनवाहिनी असलेल्या कदंब परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नवीन डिझेल बसेस दाखल होणार आहेत. महामंडळाकडे सध्या सुमारे २०० बसेसची मोठी कमतरता भासत असून, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने बस खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती कदंब महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली आहे. अर्थसंकल्पात यासंदर्भात आवश्यक तरतूद करण्यात आली असून लवकरच या बसेस प्रत्यक्ष सेवेत रुजू होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना तुयेकर यांनी सांगितले की, महामंडळाच्या अनेक बसेस १५ वर्षांहून अधिक जुन्या झाल्या आहेत. सरकारी नियमांनुसार १५ वर्षांनंतर बसेस भंगारात (स्क्रॅप) काढाव्या लागतात. गेल्या काही काळात मोठ्या संख्येने बसेस स्क्रॅप झाल्यामुळे ताफ्यातील बसेसची संख्या कमी झाली आहे. सद्यस्थितीत महामंडळाला किमान २०० नवीन बसेसची गरज आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी सरकारने फाईल मंजूर केली असून खरेदीची प्रशासकीय प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे.

विद्युत (EV) बसेसच्या तुलनेत डिझेल बसेस खरेदी करण्यामागचे कारण स्पष्ट करताना तुयेकर म्हणाले की, गोव्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात इलेक्ट्रिक बसेस चालवणे सध्या तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे. घाटाचे रस्ते, चढ-उतार आणि चार्जिंग स्टेशनची उपलब्धता या बाबी विचारात घेता, ग्रामीण भागात डिझेल बसेस अधिक कार्यक्षम ठरतात. इलेक्ट्रिक बसेस प्रामुख्याने शहरी आणि महामार्गांवर चांगल्या चालतात, मात्र शेवटच्या घटकापर्यंत सेवा देण्यासाठी डिझेल बसेसची आवश्यकता आहे.

नवीन बसेस खरेदी करताना प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि सोयीचा पूर्ण विचार केला जाणार आहे. जुन्या बसेस टप्प्याटप्प्याने बदलून त्या ठिकाणी अत्याधुनिक आणि आरामदायी बसेस आणण्याचे महामंडळाचे ध्येय आहे. यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांना होणारा प्रवास सुसह्य होईल. या नवीन बस खरेदीमुळे कदंबची सेवा अधिक विस्तारण्यास मदत होणार असून प्रवाशांना वेळेवर बस उपलब्ध होतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

हेही वाचा