पहाटे अग्निदिव्य उत्साहात संपन्न; प्रशासकीय नियोजनाचे भाविकांकडून कौतुक

पणजी : पारंपरिक प्रथा, धार्मिक विधी आणि भक्तीमय वातावरणात शिरगाव येथील श्री देवी लईराईचा जगप्रसिद्ध जत्रोत्सव मोठ्या दिमाखात साजरा झाला. 'हर्रो हर्रो'च्या जयघोषाने आणि हातातील वेतकाठी हवेत फिरवत नाचणाऱ्या धोंडगणांच्या चैतन्याने संपूर्ण शिरगाव परिसर दणाणून गेला. यावर्षी प्रशासकीय पातळीवर अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था आणि शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते, यामुळे भाविकांना आणि धोंडगणांना विनासायास दर्शन घेता आले. मॅपिंगद्वारे प्राप्त इन्फॉग्राफिक्सच्या आधारे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भक्तीच्या ऊर्जेने भारलेल्या सुमारे एक लाख नऊ हजार भाविकांनी होमकुंड विधिवेळी उपस्थिती लावून देवीचे दर्शन घेतले.

जत्रोत्सवाच्या दिवशी पहाटेपासूनच धार्मिक विधींना प्रारंभ झाला. देवीच्या कळसातील पवित्र तीर्थ गावातील प्रत्येक घरामध्ये वितरित करण्यात आले, ज्यामुळे मोगऱ्याचा सुगंध सर्वत्र दरवळला. मये येथील चौगुले मानकरी जेव्हा देवीला मयेच्या भाऊ-बहिणींचा 'कवळास' घेऊन शिरगावात दाखल झाले, तेव्हा जत्रोत्सवातील मुख्य चैतन्याला सुरुवात झाली. दुपारी १२ वाजता देवीची उत्सवमूर्ती म्हणजेच 'चिरा' मुख्य मंदिरातून वाजत-गाजत बाहेर काढण्यात आली. यावेळी धोंडगणांनी ढोलाच्या तालावर केलेले वेतनृत्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. देवीने धोंडगणांसह नाचतच आपल्या मुड्डी येथील मूळ आदिस्थानाकडे प्रस्थान केले.

या जत्रोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे पहाटे होणारे 'अग्निदिव्य'. रात्री उशिरा भव्य होमकुंड प्रज्वलित करण्यात आले. मध्यरात्रीनंतर जेव्हा होमकुंड पूर्णपणे पेटले, तेव्हा सारा परिसर प्रकाशमान झाला. देवीचा मोगरीच्या कळ्यांनी सजवलेला कळस मोडपुरुषांच्या डोक्यावर स्वार करून होमकुंडस्थळी आणण्यात आला. देवीने चंद्रज्योतीच्या साहाय्याने होमकुंडाला अग्नी दिला आणि त्यानंतर पहाटेच्या वेळी धगधगत्या निखाऱ्यांवरून अनवाणी चालत धोंडगणांनी आणि देवीच्या कळसाने आपले अग्निदिव्य पूर्ण केले. आपल्या आराध्य देवतेसमोर केलेला 'पण' पूर्ण करतानाचा हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती.

गेल्या वर्षीच्या दुर्घटनेतून धडा घेऊन यावर्षी प्रशासनाने खबरदारीचे मोठे उपाय योजले होते. मुड्डी ते मुख्य मंदिरापर्यंतचा रस्ता दुकाने मुक्त ठेवण्यात आल्याने भाविकांना चालणे सोपे झाले. तसेच, क्यू मॅनेजरच्या सुविधेमुळे दर्शनासाठी मोठी रांग असूनही कुठेही गोंधळ उडाला नाही. मोगरीच्या कळ्यांना यंदा मोठी मागणी असल्याने दरात वाढ झाली होती, तरीही भाविकांनी श्रद्धेपोटी चढ्या दराने माळा खरेदी करून देवीला अर्पण केल्या.
अस्नोडा रस्ता वेळेपूर्वी बंद केल्याने भाविक नाराज; धोंडगणांकडून विश्रांतीसाठी सुविधेची मागणी
जत्रोत्सवाच्या दरम्यान अस्नोडा येथील मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता नियोजित वेळेच्या आधीच बंद करण्यात आल्याने भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त झाली. प्रशासनाने हा मार्ग रात्री बारा वाजता बंद होणार असल्याची पूर्वसूचना दिली होती, मात्र प्रत्यक्षात रात्री अकरा वाजताच बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला. यामुळे मंदिराकडे जाणाऱ्या भक्तांची मोठी रांग लागली व प्रवाशांची किंचित गैरसोय झाली.

दुसरीकडे, जत्रोत्सवासाठी आलेल्या धोंडगणांनीही व्यवस्थापनाकडे आपली गाऱ्हाणी मांडली आहेत. पुढील वर्षापासून धार्मिक विधींच्या दरम्यान धोंडगणांना थकवा जाणवल्यास थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तळी किंवा मंदिर परिसरात पुरेशी बैठक व्यवस्था करण्यात यावी, अशी आग्रही मागणी धोंडगणांनी जत्रोत्सव समितीकडे केली आहे. प्रशासकीय नियोजनातील या त्रुटींमुळे भाविक आणि धोंडगणांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला.
वेध कौलोत्सवाचे; देवी लईराईच्या दर्शनाचे..
श्री देवी लईराईचा मुख्य जत्रोत्सव आणि अग्निदिव्य सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाल्यानंतर आज बुधवार, २२ एप्रिलपासून पुढील चार दिवस पारंपरिक 'कौलोत्सवा'ला प्रारंभ होत आहे. पहाटेचा अग्निदिव्य सोहळा पार पडल्यानंतर देवीचा पवित्र कळस चव्हाटा येथे दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. आज संध्याकाळी हा कळस थेट मानसवाडा येथे नेण्यात येईल आणि तिथूनच कौलोत्सवाची खरी सुरुवात होईल. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे देवीचा कळस शिरगावातील प्रत्येक घराच्या अंगणात जाऊन भाविकांना दर्शन देतो. यावेळी भाविक देवीची सेवा करतात आणि उपस्थित जनसमुदायाला देवीकडून 'कौल' (प्रसाद/आशीर्वाद) दिला जातो. हा सोहळा शनिवारी रात्रीपर्यंत अखंडपणे सुरू राहणार आहे.

यावर्षी जत्रोत्सवादरम्यान प्रशासनाने कमालीची सतर्कता बाळगली होती. गेल्यावर्षीच्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर, मुड्डी ते मुख्य मंदिरापर्यंतच्या मार्गा वर दुकाने थाटण्यास मनाई करण्यात आली होती. यामुळे रस्ते मोकळे राहिल्याने लाखो भाविकांना आणि धोंडगणांना उकाड्याच्या वातावरणातही सुलभपणे संचार करता आला. विशेषतः मंदिरामागे उभारण्यात आलेल्या 'क्यू मॅनेजर' यंत्रणेमुळे आणि धोंडगणांसाठी केलेल्या स्वतंत्र रांगेमुळे कुठेही गर्दीचा रेटा जाणवला नाही. भाविकांनी या सुव्यवस्थेचे तोंडभरून कौतुक केले आहे.

वाढत्या उष्णतेचा विचार करून, यंदा डोंगररांगेच्या कडेला आणि पार्किंगच्या जागेत थंड पेये व अल्पोपहाराच्या स्टॉल्सची सोय करण्यात आली होती. सुरुवातीला दुकानांवर काही निर्बंध होते, मात्र स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन डिचोलीचे उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांनी पारंपरिक दुकाने उघडण्याचे आदेश दिल्याने विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले. असह्य उकाड्यात भाविकांची पाण्यासाठी वणवण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन, आमदार प्रेमेंद्र शेट आणि शिरगावातील स्थानिक नागरिकांनी स्वयंप्रेरणेने ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय केली होती.

संपूर्ण जत्रोत्सव परिसरावर पोलीस आणि नियंत्रण कक्षाचे बारकाईने लक्ष असून, आता कौलोत्सवाच्या निमित्ताने शिरगावात पुन्हा एकदा भक्तीचा मोगरा दरवळणार आहे. शनिवारी रात्री हा उत्सव संपन्न होणार असून, प्रशासनाने भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.भक्ती आणि श्रद्धेचा हा पाच दिवसीय सोहळा शनिवार, २५ एप्रिल रोजी देवीचा कळस मंदिरात विधीवत दाखल झाल्यानंतर पूर्ण होईल.