तपासाबाबत सरकार गंभीर असून पोलीस महासंचालकांकडून घेतला जातोय सविस्तर आढावा

पणजी: वास्को येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गौतम खट्टर याच्या विरोधात गोवा सरकारने कडक पावले उचलली आहेत. खट्टर याचा शोध घेण्यासाठी गोव्याच्या पोलिसांचे एक पथक डेहराडून येथे पोहोचले असून, तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र, तो जिथे कुठे दिसेल, तिथे पोलीस त्याला तात्काळ अटक करून गोव्यात आणतील, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. या प्रकरणाचा तपास अतिशय गांभीर्याने सुरू असून मुख्यमंत्री स्वतः आणि राज्याचे पोलीस महासंचालक या तपासाचा वेळोवेळी आढावा घेत आहेत.
गौतम खट्टर याने वास्को येथे परशुराम जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात भाषण करताना वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाल्याने, आमदार, मंत्री आणि सामान्य नागरिकांकडून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली होती. सुरुवातीला वास्को पोलिसांनी या संदर्भात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. मात्र, राज्यातील इतर पोलीस स्थानकांमध्येही खट्टर विरोधात तक्रारी दाखल झाल्याने, या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मंगळवारी हा तपास गुन्हे शाखेकडे (क्राईम ब्रांच) सोपवण्याचे आदेश जारी करण्यात आले.
पोलीस पथकाने मंगळवारी रात्री डेहराडून येथील खट्टरच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली, परंतु तो तिथे मिळून आला नाही. तो सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. खट्टर विरोधात 'लूक आऊट' नोटीस जारी करण्यासह इतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार आहेत. कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यासाठी शासन कटीबद्ध असून, कोणत्याही परिस्थितीत आरोपीला सोडले जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य समोर आणले जाईल आणि दोषीवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले