आई सप्तशृंगीच्या चरणी अर्पण करण्यात आलेली २२ किलो चांदी गायब

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
29 mins ago
आई सप्तशृंगीच्या चरणी अर्पण करण्यात आलेली २२ किलो चांदी गायब

नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या गर्भगृहातील नक्षीकामाच्या चांदीमध्ये मोठी घट झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अधिकृत नोंदी आणि प्रत्यक्ष मोजणी यामध्ये तब्बल २२ किलो २९७ ग्रॅम चांदीचा फरक आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, व्यवस्थापक सुट्टीवर असताना रात्रीच्या अंधारात ही चांदी काढण्यात आल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्राथमिक चौकशीत समोर आले असून, याप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष व विश्वस्तांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मंदिराच्या जुन्या नोंदीनुसार, गर्भगृहातील नक्षीकामासाठी एकूण ४०६ किलो चांदीचा वापर करण्यात आला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या फेरमोजणीत केवळ ३८३ किलो ७०३ ग्रॅम चांदीच उपलब्ध असल्याचे निष्पन्न झाले. ही साडेबावीस किलोची तफावत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चांदी काढण्याची पद्धत. १५ सप्टेंबर २०२१ रोजी ट्रस्टने दिवसा चांदी काढण्याचा ठराव केला होता. मात्र, त्या नियोजनाला हरताळ फासत दुसऱ्याच दिवशी रात्रीच्या वेळी, अधिकृत मूल्यमापक नसताना ही चांदी उतरवण्यात आली. त्यावेळी मंदिराचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे सुट्टीवर होते. या अनधिकृत प्रकाराबाबत दहातोंडे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली होती, मात्र त्याचाच राग धरून विश्वस्तांनी त्यांचे निलंबन केल्याची चर्चा आता गडावर रंगली आहे.

सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी या गंभीर प्रकरणाचा पाठपुरावा करत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. याची दखल घेत विभागीय अपर आयुक्त जितेंद्र वाघ यांनी चौकशीचे चक्र फिरवले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

"ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी आहे, त्यांनीच विश्वासघात केला आहे," असा आरोप करत विठोबा द्यानद्यान यांनी तत्कालीन जबाबदार पदाधिकाऱ्यांवर कलम ४०९, ४२० आणि १२०-ब अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणाची दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले.  

हेही वाचा