रोमँटिक सरप्राइजच्या बहाण्याने डोळे बांधून प्रियकराचा घेतला बळी; थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

बंगळुरू : एखाद्या सस्पेन्स क्राईम थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल अशी एक अत्यंत थरारक आणि अंगावर शहारे आणणारी घटना बंगळुरू शहरात उघडकीस आली आहे. केवळ कामात गुंतून राहत आपल्याला पुरेसा वेळ देत नसल्याच्या रागातून तसेच लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने निराश झालेल्या एका २७ वर्षीय तरुणीने आपल्याच प्रियकराला 'रोमँटिक सरप्राइज' आणि 'रोल-प्ले'च्या जाळ्यात ओढून त्याची निर्घृण हत्या केली. हत्येचे गांभीर्य इतके भीषण आहे की, आरोपी तरुणीने आधी प्रियकराचे हात-पाय बांधले, त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि तो पूर्णपणे हतबल झाल्यानंतर त्याला जिवंत पेटवून दिले. वायव्य बेंगळुरूच्या ब्यादराहल्ली परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून मानवी क्रूरतेचा कळस गाठला आहे.
![]()
या प्रकरणातील संशयित तरुणीची ओळख प्रेमा (२७) अशी पटली असून, किरण (२७) असे दुर्दैवी मृत तरुणाचे नाव आहे. हे दोघेही राजाजीनगर येथील एका नामांकित मोबाईल सेवा पुरवठादार कंपनीत एकत्र कामाला होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, हे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रेमाने किरणसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, जो किरणने फेटाळून लावला. हा नकार प्रेमाच्या मनाला इतका लागला की, त्यातूनच तिच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली. या नाकारलेल्या प्रस्तावाचे रूपांतर एका भीषण कटात झाले, ज्याचा शेवट किरणच्या मृत्यूने झाला.
घटनेच्या दिवशी प्रेमाने किरणला अंजनानगर येथील आपल्या घरी एका खास 'रोमँटिक सरप्राइज'च्या बहाण्याने बोलावले. घरात प्रवेश केल्यानंतर तिने त्याला रॉमेंटिक रोल-प्लेसाठी स्वतःचे डोळे बांधण्यास आणि हात-पाय बांधून घेण्यास प्रवृत्त केले. किरणने आपल्या प्रेयसीवर विश्वास ठेवून तिच्या प्रत्येक सूचनेचे पालन केले आणि तो पूर्णपणे असहाय्य झाला. किरण जेव्हा पूर्णपणे बचावासाठी अक्षम झाला, तेव्हा प्रेमाने आधीच घरात आणून ठेवलेले पेट्रोल त्याच्या अंगावर ओतले आणि त्याला आग लावून दिली. आगीच्या ज्वाळांनी वेढलेला किरण वेदनेने ओरडत होता, मदतीसाठी याचना करत होता, मात्र प्रेमावर कोणताही परिणाम झाला नाही. उलट, तिने त्याच्या मृत्यूच्या अंतिम क्षणांचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.
![]()
किरणच्या किंकाळ्या ऐकून शेजारी आले. त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पाचारण केले. ते पोहोचले तोपर्यंत खूप उशीर झाला. किरणचा होरपळून मृत्यू झाला होता. सुरुवातीला प्रेमाने हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या जबाबात असलेल्या विसंगतीमुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी जेव्हा तिची सखोल चौकशी केली आणि तिचा मोबाईल तपासला, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. तिच्या मोबाईलमध्ये हत्येचा व्हिडिओ सापडला व त्यांनी तपासाची चक्रे फिरवली. तसेच, तिने हत्येसाठी लागणारे ज्वलनशील द्रव आधीच खरेदी केल्याचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत, यावरून ही हत्या पूर्ण नियोजित असल्याचे स्पष्ट झाले. सध्या आरोपी प्रेमा पोलीस कोठडीत असून, या गुन्ह्यातील इतर तांत्रिक पुराव्यांचा तपास सुरू आहे.