खांडोळा येथील अहिल्याबाई होळकर वसतिगृहाचे उद्घाटन

पणजी: शिक्षकांची जबाबदारी आता केवळ वर्गात शिकवण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर त्यांनी विद्यार्थ्यांना करिअरचे योग्य मार्गदर्शन करून नोकरी किंवा व्यवसायासाठी त्यांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे. प्रत्येक शिक्षकाने वर्षाला किमान १० विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारल्यास राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
खांडोळा येथील महाविद्यालयात अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या नवीन वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी शिक्षण क्षेत्रातील सद्यस्थितीवर भाष्य करताना शिक्षकांच्या भूमिकेवर विशेष भर दिला. सरकार शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी सर्व सोयीसुविधा आणि विविध योजना राबवत आहे. मात्र, अनेक विद्यार्थी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतरही रोजगाराविना घरी बसून असल्याचे चित्र दिसते. या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षा, यूपीएससी किंवा बँकिंग क्षेत्रातील संधींची पुरेशी माहिती नसते. या परिस्थितीसाठी विद्यार्थ्यांना दोष न देता, त्यांना योग्य दिशा न दाखवणाऱ्या शिक्षकांना जबाबदार धरले पाहिजे, असे खडे बोल मुख्यमंत्र्यांनी यावेळी सुनावले.

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना स्वयंरोजगाराच्या विविध योजनांची माहिती देणे ही शिक्षकांची नैतिक जबाबदारी आहे. महाविद्यालयांनी स्थानिक औद्योगिक वसाहतींशी संपर्क साधून विद्यार्थ्यांसाठी 'रोजगार मेळावे' आयोजित करावेत, जेणेकरून त्यांना स्थानिक पातळीवरच संधी उपलब्ध होतील. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर किती विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आणि किती जण स्वयंरोजगाराकडे वळले, याचा पद्धतशीर रेकॉर्ड महाविद्यालयांकडे असणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले. करिअर मार्गदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार दिल्यास राज्यातील तरुणांचे सक्षमीकरण होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
