
डेहराडून : १८१ दिवसांच्या हिवाळी विश्रांतीनंतर आज २२ एप्रिल रोजी केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्यात आले. दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसत होता.
नोव्हेंबर २०२५ मध्ये भाऊबिजेच्या दिवशी मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले होते. यंदाच्या उद्घाटन सोहळ्याला भव्यतेची जोड मिळाली. वेदघोष, लष्करी बॅंडचे सादरीकरण आणि पारंपारिक मिरवणुकीने ओमकारेश्वर मंदिर येथून भगवान केदारनाथांची मूर्ती मंदिरात आणण्यात आली. संपूर्ण मंदिर परिसर ५१ क्विंटल फुलांनी सजवण्यात आला होता, ज्यामुळे परिसराला अलौकिक तेज प्राप्त झाले.

उद्घाटनाच्या पहिल्या पूजेसाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी ( Pushkar Singh Dhami ) आपल्या कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे (Helicopter) मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यामुळे वातावरण भक्तिमय झाले.

हिवाळ्यात प्रचंड हिमवृष्टी आणि शून्याखालील तापमानामुळे मंदिर बंद ठेवण्यात आले होते. सध्या परिसरात २-३ फूट बर्फ असूनही प्रशासनाने “स्नो कॉरिडॉर” (Snow corridor) तयार करून भाविकांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला आहे.
दरम्यान, २०२६ मधील केदारनाथ यात्रा हंगाम ११ नोव्हेंबर २०२६ रोजी समाप्त होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
