गोवा : गौतम खट्टर यांच्या मतांशी सहमत नाही!

सनातन धर्म रक्षा समिती, मुरगावतर्फे स्पष्टीकरण

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
21st April, 09:01 pm
गोवा : गौतम खट्टर यांच्या मतांशी सहमत नाही!

वास्को : सेंट फ्रान्सिस झेवियर (Saint Francis Xavier) यांच्याबाबत गौतम खट्टर (Gautam Khattar) यांनी व्यक्त केलेली मते ही पूर्णपणे त्यांची वैयक्तिक मते आहेत. ती आयोजकांची किंवा ‘सनातन धर्म रक्षा समिती’ची (Sanatan Dharm Raksha Samiti) अधिकृत मते नाहीत. आयोजक समिती अशा कोणत्याही विधानांचे समर्थन करत नाही. खट्टर हे ‘राज्य अतिथी’ नव्हते. त्यांचा प्रवास, मुक्काम आणि भोजनाची व्यवस्था पूर्णपणे खासगी स्तरावर करण्यात आली होती. गोवा सरकारकडून खट्टर यांना कोणत्याही प्रकारची सुविधा पुरवण्यात आली नव्हती, असे स्पष्टीकरण सनातन धर्म रक्षा समिती, मुरगावतर्फे देण्यात आले आहे.

मंचावर बोलताना जेव्हा गौतम खट्टर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल अनुचित आणि अपमानकारक विधाने केली, तेव्हा आम्हाला मोठा धक्का बसला. कारण त्यांच्याकडून अशा वर्तनाची मुळीच अपेक्षा नव्हती. आयोजक म्हणून आम्ही त्यांना थांबवण्यासाठी त्वरित हस्तक्षेप केला. मंत्री मॉविन गुदिन्हो (Mauvin Godinho), आमदार संकल्प आमोणकर (Sankalp Amonkar) आणि कृष्णा (दाजी) साळकर (Daji Salkar) यांनी खट्टर यांना त्यांचे भाषण थांबवण्याचे निर्देश दिले. हे निर्देश आयोजक समितीमार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आले. त्यांना त्वरित थांबण्याची विनंती करणाऱ्या दोन लेखी चिठ्ठ्या त्यांच्याकडे पाठवण्यात आल्या होत्या.

सेंट झेवियर यांच्याविषयी आदर!

गौतम खट्टर यांना ‘सनातन धर्मा’विषयी बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. आमच्या ‘संरक्षक संता’बद्दल अपमानकारक विधाने करण्यासाठी नव्हे. आम्ही आमच्या संरक्षक संताबाबत श्रद्धा बाळगतो आणि त्यांचा आदर करतो. तसेच आम्ही आमच्या राज्याच्या सौहार्दाला अत्यंत महत्त्व देतो. गौतम खट्टर यांनी केलेल्या अवमानकारक विधानांमुळे ज्या गोमंतकीय बंधू-भगिनींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्या सर्वांची आम्ही मनापासून क्षमा मागतो, असे सनातन धर्म रक्षा समितीने म्हटले आहे.

हेही वाचा