सेंट झेवियरविषयी आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

खट्टरला दोन दिवसांत अटक करून गोव्यात आणणार : मुख्यमंत्री


2 hours ago
सेंट झेवियरविषयी आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गौतम खट्टर यांच्याविरोधातील गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार वास्को पोलीस ठाण्यात नोंद झालेला गुन्हा आता रायबंदर येथील गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
पोलीस उपमहानिरीक्षक वेदप्रकाश सूर्या यांनी दिलेल्या आदेशानुसार, या प्रकरणातील सर्व कागदपत्रे, पुरावे आणि संबंधित माहिती गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. तपासासाठी विशेष पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. खट्टर गोवा सोडून गेल्याची माहिती असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
परशुराम जयंतीनिमित्त वास्को येथे आयोजित कार्यक्रमात गौतम खट्टर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. यावेळी व्यासपीठावर पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो, आमदार संकल्प आमोणकर आणि आमदार कृष्णा साळकर उपस्थित होते. या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांनीही खट्टर विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. गौतम खट्टर याच्याविरोधात वास्को पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ आणि १९६ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वास्को, पणजी आणि जुने गोवा पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल झाल्यानंतर तपास एकत्रितपणे गुन्हे शाखेकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आमदार साळकरांचे स्पष्टीकरण
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मंत्री गुदिन्हो यांनी यापूर्वीच स्पष्टीकरण दिले आहे. मंगळवारी आमदार कृष्णा साळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, कार्यक्रमात गौतम खट्टर आक्षेपार्ह बोलत असताना आम्ही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी भाषण सुरूच ठेवले. जबरदस्तीने भाषण बंद केले असते तर आणखी गोंधळ झाला असता.
---
गौतम खट्टर याचा शोध सुरू असून दोन दिवसांत अटक करून त्याला गोव्यात आणले जाईल. त्यानंतर कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.
— डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

...
खट्टरने महिला आरक्षणालाही केला विरोध
परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात गौतम खट्टर याने अहल्याबाई होळकर, झाशीची राणी यांची उदाहरणे देऊन महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला होता. महिलांना आरक्षणाची गरज नाही. देशात महिलांविरोधात अत्याचार होतात. त्याविरोधात महिला खासदार आवाज उठवत नाहीत; मात्र आरक्षणाची मागणी करतात, असेही तो म्हणाला होता.