शिरगावमधील त्या दुर्घटनेने गोव्यातील सगळ्याच उत्सवांना शिस्त आणली. इतर राज्यांसारखे इथल्या मंदिरांमध्ये व्यापारीकरण झालेले नाही. शांतता, शिस्त, स्वच्छतेसाठी गोव्यातील मंदिरांची ख्याती आहे. या देवभूमीचे पावित्र्य जपण्यासाठी सर्वांनाच समजूतदारपणे वागण्याची गरज आहे.

गोवा म्हणजे देवभूमी. अनेक मोठमोठी मंदिरे गोव्याच्या वेगवेगळ्या भागांत उभी आहेत. त्यांचे महत्त्वही अनन्यसाधारण आहे. देशातील अनेक भागांतील लोकांची कुलदैवते गोव्याच्या भूमीवर आहेत. लोकदेवता सातेरी शांतादुर्गेच्या अधिवासाने गोव्याची भूमी पावन झालेली आहे. सातेरी, शांतादुर्गा, केळबाई, लईराई, मोरजाई, रवळनाथ, खेतोबा लोकदेवतांसह महालसा, शर्वाणी, कामाक्षी, कालिका, विजयदुर्गा, मल्लिकार्जुन, दामबाब अशा अनेक देवतांच्या स्थानांमुळे ही भूमी पवित्र आणि प्रसिद्ध आहे. या देवतांप्रमाणेच या भूमीतल्या वेगवेगळ्या परिसरांतील राखणदारही प्रसिद्ध आहेत. आजोबा, बोडगेश्वर, खाप्रेश्वर, कटमगाळ, दूधसागर अशी अनेक रुपे गोव्यातील लोकजीवनाचा संस्कृतीचा भाग आहेत. जशी हिंदू धर्मियांची मंदिरे, तशीच ख्रिस्ती धर्मियांची चर्चेस गोव्यात प्रसिद्ध आहेत. कुणाच्याही श्रद्धेला ठेच पोहोचणार नाही, अशा पद्धतीने गोव्याला लाभलेला हा वारसा जपला जातोय, हे विशेष. या देवस्थानांमुळे गोव्याची ख्यातीही दूरवर पोहोचलेली आहे. इथल्या देवता जेवढ्या प्रसिद्ध, तितक्याच त्यांच्या जत्रा, उत्सव प्रसिद्ध आहेत. जत्रांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या गोव्यात देवी लईराईची जत्रा आणि कौलोत्सव इथल्या समाजाचे श्रद्धास्थान आहे. शिरगावची जत्रा ही गोव्यातील सर्वात प्रसिद्ध आणि अलोट गर्दीत साजरी होणारी कदाचित ही एकमेव जत्रा असावी. इतरही अनेक जत्रा आपापल्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहेत. शिरगावच्या जत्रेला गोवा, महाराष्ट्रातून लाखो भाविक येतात. या जत्रेच्या इतिहासात प्रथमच गेल्या वर्षी चेंगराचेंगरीचा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले. गर्दीवर नियंत्रण नसल्यामुळे आणि काही लोकांच्या चुकीच्या वागणुकीमुळे ही परिस्थिती उद्भवली होती. त्यानंतर शासनाने चौकशी समिती स्थापन करून अहवाल मागवला. त्या अहवालानंतर अनेक त्रुटी समोर आल्या. त्या त्रुटी या वर्षीच्या जत्रेत दूर करण्याची संधी शासनाला मिळाली. दरवर्षी जत्रेत तीनशे ते चारशे दुकाने असतात. कुणाचेही कुणावरही नियंत्रण नसते. देवस्थान समिती आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्यामुळे या जत्रेत दुकानांचीच मोठी गर्दी होते. मागच्या वर्षीच्या दुर्घटनेनंतर यावर्षी गावातील काही पारंपरिक दुकाने वगळता बाहेरील फक्त ३०-४० दुकानांनाच परवानगी दिली आहे. देवीच्या तळीपासून, होमखंड, मुख्य मंदिर, कौल सोहळ्यापासून ते इतर कार्यक्रमांपर्यंत सर्वच बाबतीत सुसूत्रता आणण्याचा प्रशासनाचा आणि देवस्थान समितीचा प्रयत्न आहे. तो जत्रेत दिसतही आहे. भविष्यात कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासन आणि देवस्थान समितीने समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. यावेळी सुरक्षा व्यवस्थेतही वाढ केलेली दिसून येते.
देवीच्या भक्तांची संख्या दरवर्षी वाढतच असून, ती कमी होण्याचे नाव घेत नाही. गेल्या काही वर्षांत लईराईच्या जत्रेसाठी झुंबड उडत असते. सोशल मीडियावरून देवीच्या आख्यायिका जास्त लोकांपर्यंत पोहोचू लागल्यामुळे नवे भाविकही उत्सुकतेने शिरगावला येत आहेत. त्यामुळे भाविकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. गर्दीत भर पडत आहे. पण या बदलत्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे भान देवस्थान समितीलाही नव्हते आणि प्रशासनालाही. त्यामुळे गेल्या वर्षीच्या दुर्घटनेनंतर प्रशासनाचे डोळे उघडले. देवस्थान समितीला जाग आली. ती दुर्घटना टाळता आली असती, पण सर्वांनीच त्याकडे दुर्लक्ष केले होते. प्रशासन, देवस्थान समिती, भाविक, धोंडगण, दुकानदार हे सारेच त्या प्रकाराला जबाबदार होते. यापुढे शिरगावच्या जत्रेचे नियोजन योग्य पद्धतीने होईल, अशा प्रकारची व्यवस्था प्रशासनाने केली. त्याचे सकारात्मक परिणाम या वर्षीच्या जत्रेत दिसत आहेत.
गोव्यातील सगळ्याच मोठ्या जत्रांच्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन लक्ष ठेवून असते, हे विशेष. मात्र एक खरे. गोव्यात मोठमोठी देवस्थाने आहेत, मोठमोठ्या जत्रा, उत्सव होतात पण त्या ठिकाणी शिस्तही दिसते. काही अपवाद वगळता. ही शिस्त शिरगावमध्ये दिसली नव्हती, त्यामुळेच दुर्घटना घडली. त्या दुर्घटनेने गोव्यातील सगळ्याच उत्सवांना शिस्त आणली. इतर राज्यांसारखे इथल्या मंदिरांमध्ये व्यापारीकरण झालेले नाही. शांतता, शिस्त, स्वच्छतेसाठी गोव्यातील मंदिरांची ख्याती आहे. या देवभूमीचे पावित्र्य जपण्यासाठी सर्वांनाच समजूतदारपणे वागण्याची गरज आहे. देवी लईराईच्या जत्रेचे स्वरूप दरवर्षी मोठे होत जावो. देवी सर्वांना चांगले आरोग्य देवो, हीच प्रार्थना.