
गोवा हे जागतिक स्तरावरील प्रमुख पर्यटनस्थळ असले, तरी अलीकडच्या काळात येथील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था आणि रस्ता सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येसोबतच रस्ते अपघातांचे प्रमाणही झपाट्याने वाढले असून; सायबर फसवणूक, गुंतवणूक घोटाळे, अनधिकृत व्यवसाय तसेच खून, दरोडे, लैंगिक अत्याचार यासारखे गुन्हे राज्याच्या प्रतिमेला तडा देत आहेत. गुन्हेगारी वाढल्यामुळे सामान्य नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत असून, राज्याच्या गुप्तचर यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राज्यातील कळंगुट, हणजूण, मोरजी, हरमल यांसारख्या किनारी भागांसह पर्वरी, वेर्णा आणि जुने गोवा परिसरात दुचाकी अपघातांचे प्रमाण खूप वाढले आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन, मद्यपान करून वाहन चालवणे आणि रेन्ट-अ-कॅब किंवा बाईकचा बेजबाबदार वापर ही यामागील मुख्य कारणे आहेत. २०२५ मध्ये अनेक पर्यटकांसह स्थानिकांना रस्ते अपघातात प्राण गमवावे लागले. २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांत राज्यात दररोज सरासरी सात अपघात, तर दर ३४ तासांत एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू होत आहे. पोलिसांची गस्त असूनही प्रतिबंधात्मक उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील किनाऱ्यांसह ग्रामीण भागातही ड्रग्ज तस्करीची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. यात विदेशी नागरिकांसह स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे समोर येत आहे. याशिवाय राज्यात खून, लैंगिक अत्याचार, सायबर व इतर आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे समोर येत आहेत. विशेष करून किनारी भागात हल्लीच दोन दिवसांपूर्वी बागा येथील ‘टिटोज लेन’सारख्या पर्यटनस्थळ परिसरात महिलेची छेडछाड आणि तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसेच कळंगुटमध्ये एका विदेशी नागरिकाने ड्रग्ज विक्रीचा व्हिडिओ व्हायरल केला होता. अशा घटनांमुळे राज्यातील दलाली आणि रस्त्यालगतच्या अनधिकृत व्यवसायांविरुद्ध कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
गोवा पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण जाहीर केले असले, तरी केवळ गुन्ह्यानंतर होणारी कारवाई पुरेशी नाही. गुप्तचर यंत्रणेने गुन्हा घडण्यापूर्वीच माहिती मिळवून तो रोखणे अधिक महत्त्वाचे आहे. परंतु गोव्यात अनेकदा गुन्हा घडल्यानंतरच पोलिसांना तक्रारीच्या आधारे हालचाल करावी लागते. मात्र केवळ कारवाई पुरेशी नाही, तर वेळेवर गुप्त माहिती मिळवून गुन्ह्यांना आळा घालणे महत्त्वाचे आहे. पर्यटनावर अवलंबून असलेल्या गोव्यासाठी कायदा-सुव्यवस्था ही राज्याच्या प्रतिमेची बाब आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सीसीटीव्हीचे जाळे वाढवणे तसेच स्थानिक आणि पोलीस यांच्यातील समन्वय वाढल्यास गुन्हेगारीला आळा बसू शकतो. कारवाईपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिल्यासच गोव्यातील गुन्हेगारीला खऱ्या अर्थाने आळा बसू शकतो.
- प्रसाद शेट काणकोणकर