भारत होतोय उपचार पद्धतींमधील महाशक्ती

येत्या दशकात भारत केवळ 'जेनेरिक' औषधांमध्येच नव्हे, तर नावीन्यपूर्ण औषधे, फर्मेटेशन आधारित उत्पादने आणि पुढील पिढीच्या उपचार पद्धतींमध्येही एक मोठी शक्ती म्हणून उदयास येण्याच्या स्थितीत भारत आहे.

Story: विचारचक्र |
4 hours ago
भारत होतोय उपचार पद्धतींमधील महाशक्ती

जागतिक औषधनिर्माण परिदृश्यात जैविक जा औषधे, बायोसिमिलर्स आणि विशेष औषधांचा वाटा आता औषधनिर्माण महसुलाच्या ४० टक्क्यांहून अधिक आहे. जेनेरिक औषध उत्पादनामधील नेतृत्त्वामुळे दीर्घकाळापासून 'जगाचे औषधालय' म्हणून ओळखला जाणारा भारताचा औषधनिर्माण उद्योग आता व्याप्तीकडून नवोन्मेषाकडे वेगाने वाटचाल करत आहे.

आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मांडलेल्या १० हजार कोटी रुपये खर्चाच्या बायोफार्मा शक्ती या उपक्रमाची घोषणा म्हणजे या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यातूनच येत्या ८ ते १० वर्षांत जैवऔषधनिर्मिती मधील नवोन्मेष आणि जास्त परिणामकारक आणि किफायतशीर औषधोपचारांचे एक प्रमुख जागतिक केंद्र म्हणून उदयाला येण्याचा भारताचा निर्धार स्पष्ट होतो. ही दूरदृष्टी सखोल वैज्ञानिक क्षमता निर्मिती, नवोन्मेष आधारित उद्योगांना चालना आणि पुढील पिढीतील वैद्यकशास्त्रात भारताला एक अग्रणी म्हणून आपले स्थान मजबूत करण्यासाठी आवश्यक दृष्टिकोन प्रदान करेल.

जैविक औषधे आणि बायोसिमिलर्स तसेच प्रगत परिणामकारक आणि किफायतशीर औषधोपचारांना अधिकाधिक चालना देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. हे औषधनिर्माण विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि जैवतंत्रज्ञान विभागाच्या विद्यमान उपक्रमांना पूरक असून त्यामध्ये जैवऔषधांसह जीवन विज्ञान क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या 'फार्मा मेडटेक क्षेत्रातील संशोधन आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन', 'संशोधन विकास आणि नवोपक्रम योजना', 'बायोनेस्ट' इत्यादींसारख्या योजनांचा समावेश आहे. एकंदरीत हे सर्व उपक्रम भारताच्या नवोन्मेष परिसंस्थेला बळकट करणे, उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील सहकार्य दृढ करणे आणि जेनेरिक औषधांपासून ते नवोन्मेष आधारित औषध शोध आणि विकासाकडे संक्रमण सक्षम करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत.

या धोरणातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे फर्मेटेशन-आधारित उत्पादन क्षमतांचा विकास करणे हा आहे. अँटीबायोटिक्स, लसी, एन्झाइम्स आणि इतर जैव-औषधे तयार करण्यात हा विभाग खूप महत्त्वाचा असूनही, तो खूप काळापासून आयातीवर अवलंबून आहे. पायाभूत सेवा सुविधांमध्ये गुंतवणूक करून तंत्रज्ञानाचा विकास आणि हस्तांतरण साध्य करून आणि उद्देश केंद्रित प्रोत्साहन प्रदान करून भारत या महत्त्वपूर्ण क्षेत्रात देशांतर्गत क्षमता विकसित करण्याबरोबरच जागतिक स्पर्धात्मकतेत वृद्धी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

भारताच्या वैद्यकीय संशोधन परिसंस्थेचा विस्तारही तितकाच महत्त्वाचा आहे. उभारण्यात येणाऱ्या एक हजार मान्यताप्राप्त क्लिनिकल ट्रायल साइट्समुळे जागतिक औषध विकास केंद्र म्हणून भारताची प्रतिमा लक्षणीयरीत्या उंचावेल. किफायतशीर दर आणि कुशल संशोधकांच्या वाढत्या प्रमाणामुळे भारत अत्यंत प्रभावी आणि उच्च दर्जाच्या क्लिनिकल ट्रायलसाठी अगणित संधी प्रदान करणार आहे. त्यासोबतच नियामक चौकटीचे बळकटीकरण आणि संस्थात्मक क्षमतांमधील वृद्धीमुळे भारताला जागतिक मापदंडांशी सुसंगत कामगिरी करणे शक्य होईल, जलदगती मान्यता आणि जागतिक हितधारकांमध्ये विश्वास वाढीला लागेल.

गेल्या काही वर्षांमध्ये भारताने उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन आणि बल्क ड्रग पार्क अशा योजनांच्या मदतीने सक्रिय औषधनिर्माण घटक आणि प्रमुख कच्चा माल यांचे देशांतर्गत उत्पादन जलद गतीने वाढवले आहे. यामुळे देशातील औषधांच्या किंमती कमी झाल्या असून त्या जगातील सर्वात कमी आहेत, त्यामुळेच नागरिकांना आरोग्यसेवा अधिक किफायतशीर दरात प्राप्त होणे शक्य झाले. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेमुळे स्वस्त दरात चांगल्या दर्जाच्या जेनरिक औषधांची उपलब्धता वाढली आहे. १९ हजार पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांमधून लाखो लोकांना सेवा दिली जाते. कर्करोग आणि दुर्मिळ आजारांवरील औषधांसारख्या महत्त्वपूर्ण उपचारांवरील सीमा शुल्काचे सुसूत्रीकरण यांसारख्या पूरक उपायांमुळे, जीवनरक्षक उपचारांची उपलब्धता आणखी सुधारत आहे. प्रगत उपचारपद्धती जसजशा अधिक व्यापक होत जातील, तसतसे त्या परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतील आणि सर्वांना समान संधी मिळेल हे सुनिश्चित करणे, हे एक प्रमुख धोरणात्मक प्राधान्य राहील.

जसजसे उद्योगक्षेत्र बदलत आहे, भारत सुस्थापित बाजारपेठेतच नव्हे तर विशेषतः नवोन्मेष आधारित क्षेत्रांमध्येही आपले अस्तित्त्व अधिक ठळकपणे विस्तारण्याच्या प्रयत्नात आहे. सर्व धोरणे या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहेत. नियामक सुसूत्रीकरण, मंजुरी प्रक्रियेचे डिजिटलायझेशन आणि जलद मंजुरी या प्रयत्नांमुळे व्यवसाय सुलभता सुधारत आहे. गुणवत्ता मानके आणि नियामक प्रक्रिया अधिक मजबूत करणे या दोन गोष्टींमुळे भारताच्या औषधनिर्माण उत्पादनांमधील जागतिक विश्वास वाढीला लागत आहे. मात्र संशोधन आणि विकासाकरता लागणारी सातत्यपूर्ण गुंतवणूक हे एक प्रमुख आव्हान ठरत आहे. यावर मात करुन दीर्घकालीन संशोधन कायम पुढे नेण्यासाठी सार्वजनिक-खाजगी क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करणे गरजेचे आहे.

भविष्यात डोकावताना, धोरणात्मक पाठिंबा, तांत्रिक प्रगती आणि बाजारपेठेतील संधी यांनी औषधनिर्माण क्षेत्रासाठी वृद्धीची वैशिष्ट्यपूर्ण कवाडे खुली केली आहेत. भारताची देशांतर्गत बाजारपेठ आधीच चार लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याची असून, ती पुढेही सातत्याने वाढणार आहे. येत्या दशकात भारत केवळ 'जेनेरिक' औषधांमध्येच नव्हे, तर नावीन्यपूर्ण औषधे, फर्मेटेशन आधारित उत्पादने आणि पुढील पिढीच्या उपचार पद्धतींमध्येही एक मोठी शक्ती म्हणून उदयास येण्यासाठी सुस्थितीत आहे.

सारांश, भारताचे औषधनिर्माण क्षेत्र, नवोन्मेष, लवचिकता आणि जागतिक स्पर्धात्मकतेच्या एका नवीन वैशिष्ट्यपूर्ण टप्प्यात प्रवेश करत आहे. बायोफार्मा शक्ती कार्यक्रम, सतत विस्तारणारी वैद्यकीय पायाभूत सेवासुविधा आणि उद्दिष्ट केंद्रीत उत्पादन प्रोत्साहन यांसारख्या उपक्रमांच्या पाठबळावर, भारत सातत्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या जेनेरिक औषधांच्या केंद्राकडून उच्च मूल्याच्या जैवऔषध नवोन्मेषातील अग्रणी देशाकडे स्थिरपणे स्थित्यंतर करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारत २०४७ अंतर्गत जागतिक आरोग्यसेवा आणि व्यापक उद्दिष्टांमध्ये भारताची भूमिका मजबूत करण्यासाठी हे परिवर्तन केंद्रस्थानी असेल.


- जगत प्रसाद नड्डा,
(लेखक केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायन आणि खते मंत्री आहेत.)