राज्यातील ९० टक्के कामगार करतात आठवड्यातील सातही दिवस काम

देशातील ४.५५ लाख कामगारांचे सर्व्हेक्षण : केंद्रीय सांख्यिकी-अमंबजावणी खात्याच्या अहवालाची माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14 mins ago
राज्यातील ९० टक्के कामगार करतात आठवड्यातील सातही दिवस काम

पणजी : राज्यातील ८९.९ टक्के कामगार आठवड्यातील सातही दिवस काम करतात. याची राष्ट्रीय सरासरी ८२.१ टक्के इतकी आहे. सातही दिवस काम करण्याच्या क्रमवारीत ९६ टक्क्यांसह हिमाचल प्रदेश प्रथम स्थानी आहे. तर गोवा देशात दहाव्या स्थानावर आहे. गोव्यातील ७० टक्के कामगार आठवड्यात ३६ ते ४८ तास काम करतात. केंद्रीय सांख्यिकी आणि अमंबजावणी खात्याच्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे. यासाठी खात्याने जानेवारी ते डिसेंबर २०२५ दरम्यान देशातील ४.५५ लाख कामगारांचे सर्व्हेक्षण केले होते.
अहवालनुसार, गोव्यात सहा दिवस काम करणाऱ्या कामगारांची टक्केवारी ६.४ आहे. १.६ टक्के कामगार ५ दिवस, १.२ टक्के कामगार ४ दिवस, ०.४ टक्के कामगार ३ दिवस काम करतात. तर १ आणि २ दिवस काम करणाऱ्या कामगारांची टक्केवारी प्रत्येकी ०.३ इतकी आहे. एका आठवड्यात अधिक काम करण्याच्या क्रमवारीत हिमाचल नंतर सिक्कीम (९५.९ टक्के), मणिपूर (९४.१ टक्के), राजस्थान (९२.३ टक्के), मिझोरम (९१.३ टक्के) या राज्याचा क्रमांक लागतो.
ओडिशा मधील कामगारांमध्ये आठवड्याचे सातही दिवस काम करणाऱ्याचे प्रमाण देशात सर्वात कमी म्हणजेच ७३.५ टक्के इतके आहे. झारखंड (७५.४ टक्के), आंध्र प्रदेश (७६ टक्के), कर्नाटक (७६.२ टक्के) या राज्यात हे प्रमाण तुलनेने कमी आहे. गोव्यातील १०.९ टक्के कामगार ४८ ते ६० तास, ४.५ टक्के कामगार ६० ते ७२ तास, ४.३ टक्के कामगार ७२ ते ८४ तास काम करतात. तर ३.१ टक्के कामगार आठवड्यात १२ ते २४ तास काम करतात असे अहवालात नमूद केले आहे.
कामगारांचे आठवड्यातील कामाचे दिवस (गोवा)
७ दिवस काम करणारे : ८९.९%
६ दिवस काम करणारे : ६.४%
५ दिवस काम करणारे : १.६%
४ दिवस काम करणारे : १.२%
३ दिवस काम करणारे : ०.४%
१ व २ दिवस काम करणारे : प्रत्येकी ०.३%
कामगारांचे आठवड्याचे कामाचे तास (गोवा)
३६ ते ४८ तास : ७०%
४८ ते ६० तास : १०.९%
६० ते ७२ तास : ४.५%
७२ ते ८४ तास : ४.३%
१२ ते २४ तास : ३.१%
देशातील आघाडीची राज्ये (७ दिवस काम करणारे)
हिमाचल प्रदेश – ९६%
सिक्कीम – ९५.९%
मणिपूर – ९४.१%
राजस्थान – ९२.३%
मिझोरम – ९१.३%

हेही वाचा