पळ काढलेल्या कार चालकास विर्नोडा येथे अटक

म्हापसा : कामरखाजन म्हापसा येथे पेडे जंक्शनजवळ सर्व्हिस रोडवर हीट अॅण्ड रन अपघातात दुचाकीस्वार पीरसाब ख्वाजा (६०, रा. थिवी) हे गंभीर जखमी झाले. स्कुटरला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढलेल्या कारचालकाला विर्नोडा येथे पोलिसांनी पकडले. संशयित कारचालक वसिम मुल्ला (२४, रा. सांगली) याला म्हापसा पोलिसांनी अटक केली.
अपघात बुधवार, दि. १५ रोजी दुपारी २.३० वा. सुमारास घडला होता. दुचाकीस्वार जीए ०३ एनयू २२३१ क्रमांकाच्या स्कुटरवरून तार बस्तोडा जंक्शन ते पेडे जंक्शनच्या दिशेने सर्व्हिस रोडने जात होता. कामरखाजन येथे अज्ञात कारने दुचाकीला मागून धडक दिली. ही धडक बसताच चालकाचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले व तो रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाला. त्याच्यावर म्हापसा जिल्हा इस्पितळात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर कुटुंबियांनी जखमीला तिसवाडीतील एका खासगी इस्पितळात हलवले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघात घडताच कार चालकाने गाडीसह घटनास्थळावरून पळ काढला होता. म्हापसा पोलिसांनी सदर कारची माहिती पेडणे पोलिसांना दिली. बुधवारी सायंकाळी विर्नोडा येथील एका अंतर्गत रस्त्यावर पोलिसांनी एमएच ०९ सीएफ ८५९५ क्रमांकाची कार तसेच कारमधील चार जणांना पकडून ताब्यात घेतले. नंतर त्यांना म्हापसा पोलिसांच्या स्वाधीन केले.
म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी ‘हीट अॅण्ड रन’ अपघात म्हणून गुन्हा नोंदवून संशयित कार चालक वसिम मुल्ला याला अटक केली. तसेच कार जप्त केली. पुढील तपास पोलीस हवालदार केशव नाईक हे करीत आहेत.
पर्यटक माघारी परतत असताना अपघात
संशयित आरोपी वसिम मुल्ला व त्याचे तीन मित्र गोव्यात पर्यटनासाठी आले होते. कळंगुट तसेच राज्यातील इतर भागातील पर्यटनाचा आस्वाद घेऊन हे चारही पर्यटक माघारी गावी परताना हा अपघात घडला. त्यांना बुधवारची रात्र गोव्यातच काढावी लागली.