अटक केलेले सर्व अकराही आरोपी जामीनमुक्त

म्हापसा : साकवाडी हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन क्लब’ अग्नितांडव प्रकरणातील संशयित आरोपी क्लबचे कॉर्पोरेट सरव्यवस्थापक राजीव मोडक आणि ऑपरेशनल व्यवस्थापक बिजय कुमार सिंग या दोघांचीही म्हापसा अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केली. या प्रकरणात अटक केलेले सर्व ११ ही आरोपी जामीनमुक्त झाले आहेत.
प्रत्येकी ५० हजार रुपये हमी रक्कम व तितक्याच रकमेचा हमीदार, न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, सात दिवसांच्या आत पारपत्र जमा करणे, साक्षीदारांवर दबाव आणू नये किंवा पुराव्यांशी छेडछाड करू नये. खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला न्यायालयात उपस्थित रहावे, अशा अटी न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी हा जामीन अर्ज मंजूर करताना लागू केल्या आहेत.
दरम्यान, ही दुर्घटना ६ डिसेंबर २०२५ रोजी घडली होती. दुर्घटनेत २५ निष्पाप लोकांचा बळी केला होता. तर, सहाजण जखमी झाले होते. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी ७ डिसेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर यांच्या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहितेच्या १०५, १२५, १२५(अ), १२५(ब), २८७ व ३(५) कलमान्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी या क्लबच्या बिईंग जीएस हॉस्पिलिटी गोवा हडफडे एलएलपी कंपनीचे मालक अजय गुप्ता, सौरभ लुथरा, गौरव लुथरा यांच्यासह कॉपोरेट सरव्यवस्थापक राजीव निमाईचंद्र मोडक (नवी दिल्ली), सरव्यवस्थापक विवेक चंद्रभान सिंग (उत्तरप्रदेश), ऑपरेशन मॅनेजर बिजय कुमार उमेशनारायण सिंग (झारखंड), गेट मॅनेजर प्रियांशू कृष्णकुमार ठाकूर (नवी दिल्ली), बार मॅनेजर राजविर रुद्रनाथ सिंघानिया (उत्तरप्रदेश), भरत सिंग कोहली (दिल्ली), माजी सरपंच रेशन रेडकर (हडफडे), बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर (मयडे) यांना अटक केली होती. हे सर्वजण आता जामिनावर मुक्त आहेत.
तिघांविरुद्ध विनाअटक आरोपपत्र दाखल
वरील संशयित आरोपींसह जागेचे मालक सुरींदर कुमार खोसला तसेच बर्चमध्ये नृत्य सादरीकरण करणाऱ्या के डान्स इव्हेन्ट प्रा. लि. कंपनीचे संचालक मयुर मृगांक कोलवाळकर (आल्तो पर्वरी) व के इव्हेंट प्रा. लि. कंपनीचे सरव्यवस्थापक मोहम्मद अफिफबतेरी (आल्तो पर्वरी) अशा १४ जणांविरुद्ध पोलिसांनी आरोपपत्र सादर केले आहे. खोसला, कोलवाळकर व अफिफबतेरी यांच्याविरुद्ध विनाअटक आरोपपत्र दाखल झाले आहे.