न्यायालयाने ठोठावला प्रत्येकी १० हजारांचा दंड

म्हापसा : शहर परिसरात मॉडीफाईड सायलेंसरचा वापर करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या सहा बुलेटस्वारांविरुद्ध म्हापसा वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. जप्त केलेल्या या बुलेट मोटारसायकल मालकांना प्रत्येकी १० हजारांचा दंड म्हापसा न्यायालयाने ठोठावला. तसेच यापुढे कायद्याचे उल्लंघन झाल्यास दुचाकीची नोंदणी रद्द करण्याचा इशारा न्यायालयाने संबंधितांना दिला.
संबंधित बुलेट मालकांना तातडीने मॉडिफाईड सायलेंसर काढून टाकावेत व त्या जागी कंपनीचे मूळ सायलेंसर बसवावे. यापुढे अशाप्रकारचे उल्लंघन करू नये, अशी ताकीद म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयाने संबंधितांना दिली. या उल्लंघनकर्त्यांमध्ये पाच जण स्थानिक तर एका महाराष्ट्रमधील युवकाचा समावेश आहे.
म्हापसा वाहतूक पोलीस निरीक्षक मार्लन डिसोझा यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी शुक्रवारी सहा बुलेट मोटारसायकल पकडल्या. यात मॉडिफाईड सायलेंसरचा वापर झाला होता. या सायलेंसरमुळे कानठिळ्या बसविणारा आवाज येत होता व ते ध्वनिप्रदूषणाचे कारण ठरत होते. उल्लंघनकर्त्यांमध्ये एका महाराष्ट्रातील युवकाचा समावेश आहे. तो म्हापशात आपल्या नातेवाईकाला भेटायला आला होता.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून म्हापसा आणि परिसरात मॉडिफाईड सायलेंसरचा वापर केलेल्या या दुचाकींचा नागरिकांना त्रास होत होता. अशा बेशिस्त आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कडक मोहीम राबवली आहे. याच मोहिमेंतर्गत म्हापसा वाहतूक विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली.