आयपीएल बेटिंग : गुन्हा शाखेचे दोन ठिकाणी छापे

दहा जणांना अटक : लॅपटॉप, टीव्ही, मोबाईलसह २८ लाखांचा मुद्देमाल जप्त


5 hours ago
आयपीएल बेटिंग : गुन्हा शाखेचे दोन ठिकाणी छापे

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : राज्यात आयपीएल बेटिंग विरोधात गुन्हा शाखेने गुरुवारी रात्री तिसवाडीत दोन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत १० संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ९५ मोबाईल, ८ लॅपटाॅप, ७७ सिमकार्ड, १८ डेबिड कार्ड व इतर एेवज मिळून २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आयपीएल सामन्यादरम्यान सुरू असलेल्या बेटिंग रॅकेटची माहिती गुन्हा शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास दयेकर आणि अर्जुन सांगोडकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दोन ठिकाणी कारवाई केली. त्यात रायबंदर येथील एका बंगल्यावर आणि जुने गोवा येथील एका ठिकाणी कारवाई करण्यात आली. रायबंदर येथील कारेकर रेझीडेन्सीतील एका व्हिलावर केलेल्या कारवाईत ८ जणांना अटक करण्यात आली. यात दिग्विजय देवांगन (२९, छत्तीसगढ), मनीष सुर्होता (२१, हरियाणा), समीर श्यामलाल (२०, हरियाणा), गौतम परितूर (२८, उत्तर प्रदेश), ध्रूव चायवाणी (२०, मध्य प्रदेश), कमल सिंग (२२, छत्तीसगढ), भूपेंद्र सिंग (२०, छत्तीसगड) आणि करण चौहान (२०, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून २ लाख रुपयांच्या रोख रकमेसह ४८ मोबाईल, ४ लॅपटाॅप, २८ सिमकार्ड, १८ डेबिड कार्ड व इतर एेवज मिळून ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसरी कारवाई पोलीस निरीक्षक विकास दयेकर यांच्या नेतृत्वाखाली हवालदार अभिजीत गावडे, काॅन्स्टेबल रूपेश गायकवाड, सर्वेश राणे, दत्तराज राणे, दीप्तेश केरकर या पथकाने केली. त्यांनी जुने गोवा येथील कदंब पठारावरील ‘गेरा रिवर आॅफ जाॅय’ यातील एका बंगल्यावर छापा टाकला. त्यात मध्य प्रदेश येथील लकी कश्यप (२७) आणि करण आर्यन (२९) यांना अटक केली. त्यांच्याकडून २० लाख रुपये किमतीचे ४७ मोबाईल, ४ लॅपटाॅप, १ टॅब, ४९ सिमकार्ड, १ टीव्ही, ७ बँक पासबूक व इतर मुद्देमाल जप्त केला. संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, माहिती व तंत्रज्ञान कायदा आणि जुगार कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हे नोंद केले आहेत.
संशयितांवर पैसे देणे-घेण्याची होती जबाबदारी
गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ‘रेड्डी८८८’ आणि ‘फेअर प्ले’ या प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून आयपीएल बेटिंग घेत होते. या प्लॅटफॉर्मद्वारे लावल्या जाणाऱ्या बेटिंगचे पैसे स्वीकारणे व परत देणे या व्यवहारांचे व्यवस्थापन संशयित पाहत होते.