७७ कोटी रुपयांची सायबर फसवणूक; गुजरात पोलिसांचे गोव्यात छापे

गाेव्यातून ९, गुजरातमधून ७ जणांना अटक


just now
७७ कोटी रुपयांची सायबर फसवणूक; गुजरात पोलिसांचे गोव्यात छापे

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : देशभरात वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर गुजरात पोलिसाच्या सीआयडी क्राईमच्या ‘सायबर सेंटर ऑफ एक्सलन्स’ने गोवा आणि गुजरात राज्यांत तीन ठिकाणी छापे टाकून तब्बल ७७ कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीशी संबंधित आंतरराज्य ‘म्युल बँक अकाऊंट’ रॅकेटचा पर्दाफाश केला. तीन बनावट कंपन्या तयार करून पैशांची उलाढाल केली जात होती. गोव्यातून रॅकेटचा मुख्य सूत्रधार जितू ठक्करसह ९ जणांना, तर एकूण १६ संशयितांना अटक करण्यात आली आहे.
गुजरात सीआयडीच्या माहितीनुसार, संशयितांनी २६० हून अधिक म्युल बँक खाती तयार करून ती देशभरातील सायबर गुन्ह्यांतील रक्कम हस्तांतरित करण्यासाठी वापरली. या रॅकेटचा संबंध ३७५ सायबर गुन्ह्यांशी असून एकूण व्यवहार ७७ कोटी ७२ लाख ७६ हजार ४८१ रुपयांचा आहे. रॅकेटची माहिती मिळाल्यानंतर वडोदरा (गुजरात) येथून सूत्रधार किरण जोशीसह ५ जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर पालनपूरमधून दोघांना अटक केली. त्यांचे साथीदार गोव्यात असल्याचे समजल्यावर गुजरात पोलिसांनी १२ एप्रिलला हडफडे-बार्देश येथील हेरिटेज एक्झॉटिका व्हिला येथे कारवाई करून ९ संशयितांना अटक केली. सर्व संशयित सात ते आठ महिन्यांपासून हडफडेतून कार्यरत होते. या रॅकेटमध्ये मुख्य सूत्रधार जितू ठक्करसह साहिल प्रजापती, जैमिन प्रजापती, विजय नाई, हितेश ठाकोर, ध्रूव चौधरी, अनिलकुमार चौधरी, आशिषकुमार चौधरी आणि नरेशकुमार खरशन यांचा समावेश आहे. रॅकेटचे मुख्य सूत्रधार किरण जोशी व जितू ठक्कर असल्याचे समोर आले आहे. इतर आरोपी म्युल खाती उघडण्यास व आर्थिक व्यवहार सुलभ करण्यास मदत करत होते.
पोलीस महासंचालक के. लक्ष्मी नारायण राव आणि पोलीस महानिरीक्षक बिपिन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक राजदीपसिंह झाला, संजयकुमार केशवाला आणि विवेक भेदा यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक के. बी. देसाई, अनमोल सालिया, वाय. एस. गामित, ए. ए. चौधरी, एस. एम. सोनी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली.
तीन बनावट कंपन्यांद्वारे व्यवहार
संशयितांनी ‘शिवम एजन्सी’, ‘शिवधारा मसाला बिझनेस’ आणि ‘एम आर वॉटर’ अशा बनावट कंपन्या स्थापन करून म्युल खात्यांद्वारे होणाऱ्या व्यवहारांना कायदेशीर स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. डिजिटल अरेस्ट, गुंतवणूक फसवणूक, युपीआय फसवणूक, कर्ज फसवणूक, पार्ट-टाईम जॉब फसवणूक आणि गेमिंग फसवणूक अशा विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांमध्ये हे रॅकेट सक्रिय होते.
संशयितांनी दिली २६०हून अधिक खात्यांची माहिती
गोव्यातील छाप्यांमध्ये पोलिसांनी १५ लॅपटॉप, ७२ मोबाईल फोन, १२६ सिमकार्ड, ११५ डेबिट कार्ड, ८० पासबूक, १५ चेकबूक, ७ क्यूआर कोड, २ पेन ड्राइव्ह आणि १ भाडेकरार जप्त केला. वडोदरा आणि पालनपूरमधून १३ मोबाईल, १३ चेकबूक व २ पासबूक हस्तगत करण्यात आले. एकूण २६० हून अधिक बँक खात्यांची माहिती संशयितांकडून मिळाली आहे.
पोलिसांना आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा संशय
जप्त केलेल्या उपकरणांच्या तपासणीत बँक स्टेटमेंट, व्यवहार नोंदी, लॉग-ईन माहिती व सायबर फसवणुकीच्या तक्रारी आढळल्या. व्हॉट्सअॅप व टेलिग्राम ग्रुपद्वारे बँक खात्यांचे तपशील दुबई व इतर परदेशी ठिकाणी शेअर केले जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. यामुळे या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय गुजरात पोलिसांनी व्यक्त केला आहे. बँक खातेदार खात्यातून होणाऱ्या सर्व व्यवहारांसाठी कायदेशीररीत्या जबाबदार असतो. गोव्यातील पर्यटन व डिजिटल व्यवहारांचे प्रमाण पाहता नागरिकांनी सतर्क राहून कोणालाही बँक किट किंवा सिमकार्ड देऊ नये, असे आवाहन गुजरात पोलिसांनी केले आहे.