गोवा : धोकादायक ठिकाणी पोहायला जाऊ नका!

मुख्यमंत्र्यांचे आवाहन : पाणवठ्यांमध्ये उतरताना सावधगिरी बाळगा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
गोवा : धोकादायक ठिकाणी पोहायला जाऊ नका!

पणजी : उन्हाळ्याच्या दिवसांत विद्यार्थी, तरुण तसेच ज्येष्ठांनी धोकादायक तलाव, झरे तसेच नद्यांमध्ये पोहायला (swimming) जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa chief minister Dr. Pramod Sawant) यांनी केले आहे. सरकारने ‘नो स्विमिंग झोन’ असे फलक लावण्यासोबतच इतर उपाययोजनाही केल्या आहेत. सुरक्षेसाठी लोकांनी धोकादायक ठिकाणी पोहणे बंद करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात उकाड्याचे प्रमाण वाढत आहे. राज्यातील कमाल तापमान ३४ अंशांपर्यंत पोहोचू लागले आहे. येत्या दोन दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुलांच्या परीक्षा आता संपल्या आहेत. अनेक जण मजेसाठी कौटुंबिक सहली (पिकनिक) काढू लागले आहेत. याशिवाय गावातील तरुणही एकत्र येऊन उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी पोहायला जात आहेत. यामुळे अपघात तसेच बुडून मरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेला ही सूचना केली आहे.

कुडचडे येथील एक कुटुंब सहलीसाठी खणगिणी - बेतुल येथे गेले होते. यापैकी श्लोक नायक आणि सानिका नायक या भाऊ-बहिणीचा बुडून मृत्यू झाला. १० वर्षांच्या श्लोकला वाचवण्यासाठी त्याची बहीण सानिका पाण्यात उतरली आणि बुडली. उपचारादरम्यान गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात सानिकाचा मृत्यू झाला. ही अत्यंत दुःखद घटना आहे. लहान मुलांचा अशा प्रकारे बुडून मृत्यू होणे, ही गंभीर बाब आहे.

निर्जन स्थळे टाळा!

शक्य आहे त्या ठिकाणी सरकारने जीवरक्षक तैनात केले आहेत. मात्र, सर्वच ठिकाणी जीवरक्षक ठेवणे शक्य नाही. धोकादायक ठिकाणी 'नो स्विमिंग झोन' असे फलक लावले आहेत. अशा क्षेत्रात लोकांनी पोहायला जाऊ नये. ग्रामीण भागात डोंगरांजवळ ओढे तसेच झरे असतात, ज्यांची माहिती सरकारी यंत्रणांना नसते. बुडण्याच्या घटना अशाच ठिकाणी घडल्या आहेत. सुरक्षेसाठी निर्जनस्थळी लोकांनी पोहायला जाऊ नये, असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे.

हेही वाचा