दोघांमधील आरोप-प्रत्यारोपांची पक्षाने घेतली दखल

पणजी : पेडणेचे (Pernem) आमदार प्रवीण आर्लेकर (Pravin Arlekar) आणि माजी मंत्री मनोहर आजगावकर यांच्यामध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांचे पडसाद भाजप (BJP) पक्षात उमटू लागले आहेत. या दोघांमधील या शाब्दीक वादामुळे भाजपचे वरीष्ठ नेतेही नाराज आहेत. याची दखल घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी या दोघाही नेत्यांना बोलावून घेऊन समज देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दामू नाईक म्हणाले की, पक्षांतर्गत मतभेद सार्वजनिक पातळीवर मांडणे योग्य नाही. त्यामुळे आर्लेकर आणि आजगावकर या दोघांनाही एकत्र बसवून संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.
दरम्यान, या वादामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाने त्वरित हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे संकेत दिले आहेत. पक्षातील शिस्त आणि एकजूट कायम ठेवणे हेच भाजपचे प्रमुख ध्येय असल्याचेही नाईक यांनी स्पष्ट केले आहे.