निष्क्रिय, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना धडा शिकवणार

आमदार नीलेश राणे : हप्ते घेत असल्याचा पोलिसांवर गंभीर आरोप


30th May, 11:48 pm
निष्क्रिय, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना धडा शिकवणार

प्रतिनिधी। गोवन वार्ता
सिंधुदुर्ग : पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांच्या काळात अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे. गोवा बनावटीची दारू सिंधुदुर्गातून रत्नागिरी जिल्ह्यात जाते. राजापुरात कारवाई होते; मग सिंधुदुर्गात कारवाई का होत नाही ? दोन नंबर धंदेवाल्यांकडून दोन ते अडीच कोटी रुपये घेतले जातात, असा गंभीर आरोप आमदार नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. दहिकरांसारखे निष्क्रिय आणि भ्रष्टाचारात बरबटलेल्या अधिकाऱ्यांना मी असेपर्यंत थारा नाही. दहिकरांच्या विरोधात पालकमंत्र्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे आमदार राणे यांनी स्पष्ट केले.
आमदार नीलेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या साधारण ११०० ते १२०० गुन्ह्यांची नोंद आहे. या संदर्भात पोलीस विभागाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. गुन्ह्यांपासून शिक्षेपर्यंत पोहोचण्याचा दर चिंताजनक आहे. मागील दीड वर्षांतील कन्विक्शन रेट २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. प्रमुखच निष्क्रिय असतो, तेव्हा संपूर्ण यंत्रणेवर त्याचा परिणाम होतो. पोलिसांनी आजवर मोठा सप्लायर पकडला आहे का ? असा एकही सूत्रधार सापडला नाही की ज्याला पकडल्यावर संपूर्ण रॅकेट बंद होईल. फक्त किरकोळ कारवाई करून ‘आम्ही काम करतोय’ असे दाखवले जात आहे, असा आरोपही राणे यांनी केला. सिंधुदुर्ग पोलीस दलात अनेक पदे रिक्त आहेत. ती पदे भरण्याची जबाबदारी कोणाची ? दोडामार्गमध्ये रबर प्लांटेशनच्या नावाखाली परप्रांतीय लोक गांजा उगवतायत. ड्रॅग्ज उगवले जातायत. मग पोलीस अधीक्षकांना दोडामार्गमध्ये जाऊन कारवाई करण्याचे सुचले नाही ? मटका, दारू, जुगार, तस्करी यासह सर्व दोन नंबर धंद्यांकडून पोलिसांचे कलेक्शन सुरू आहे.
पालकमंत्री स्वतः मटक्याच्या ठिकाणी जाऊन छापा मारतात हे पोलीस अधीक्षकांचे अपयश आहे. जिल्हा दारू, गांजा, ड्रग्ज, मटका मुक्त झालाच पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुखमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे यांचीही हीच भूमिका आहे, असेही नीलेश राणे यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार वैभव नाईकांवर टीका
आपली सुरक्षा पोलीस अधीक्षकांनी कमी केली, या माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या आरोपांना आमदार नीलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. सुरक्षा कमी-जास्त करण्याचा अधिकार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे नसून तो राज्य सरकारच्या गृह खात्याकडे असतो. दहा वर्षे आमदार राहिलेल्या व्यक्तीला हे माहिती नसणे आश्चर्यकारक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर काही काळ सुरक्षा व्यवस्थेतील वाहनांमध्ये कपात करण्यात आली. पंतप्रधान स्वतः दोन गाड्यांच्या ताफ्यामध्ये फिरायला लागले. देशावरील संकट कमी होईपर्यंत सर्वांनाच हे करणे आवश्यक आहे, असेही राणे यांनी स्पष्ट केले            

हेही वाचा