अपघातात दुचाकीस्वार युवकाचा झाला होता मृत्यू

म्हापसा : शिवोली येथे झालेल्या प्राणघातक अपघातास कारणीभूत थार जीप चालक यादूकृष्णन एस (२९, रा. शिवोली व मूळ केरळ) याला म्हापसा न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अपघातात संकेत सूर्यकांत दाभोळकर (३४, रा. दांडा शिवोली) या दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला होता. तर, गंभीर जखमी निश्चल मोरजकर (१४, रा. हणजूण) याच्यावर गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघात शुक्रवार २९ रोजी सकाळी ६.३० वा. सुमारास फर्नांडिसवाडा, शिवोली येथील व्हिला अंटिगाजवळ घडला होता. जीए ०३ झेड ८१०० क्रमांकाची थार जीपने जीए ०३ जे १३३२ या डिओ स्कुटरला जोरदार धडक दिली होती. संशयित जीप चालक यादूकृष्णन एस हा दारूच्या नशेत गाडी चालवत होता. थार जीपच्या धडकेत दुचाकीस्वार संकेत दाभोळकर व निश्चल मोरजकर हे दोघेही गंभीर जखमी झाले. संकेत याचा म्हापसा जिल्हा इस्पितळात नेताना वाटेतच मृत्यू झाला होता.
तर निश्चलला पुढील उपचारार्थ गोमेकॉमध्ये पाठवण्यात आले होते. या अपघातात त्याच्या शरीराची अनेक हाडे तुटली गेल्यामळे त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, हणजूण पोलिसांनी संशयित जीप चालक यादूकृष्णन एस याच्याविरुद्ध भा.न्या.सं.चे कलम २८१, १२५(ब) व १०५ आणि मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये गुन्हा नोंद करून त्याला शुक्रवारीच अटक केली होती. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.