मॅजेस्टिक पॅरेडाईस कॅसिनोच्या २ लाखांच्या चिप्सची चोरी

पर्वरी पोलिसांत कर्नाटकातील दोघांविरुद्ध गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th May, 11:36 pm
मॅजेस्टिक पॅरेडाईस कॅसिनोच्या २ लाखांच्या चिप्सची चोरी

म्हापसा : पर्वरी मॅजेस्टीक पॅरेडाईस कॅसिनोमधील २ लाखांच्या चीप्स चोरल्याप्रकरणी कर्नाटकातील दोघा ग्राहकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हुसेन जामखंडी (२७, रा. बेळगाव) व अशोका कुबेरा शेत्रू के आर (२६, रा. नगर देवनागेरे) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. संशयितांविरुद्ध पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

चोरीचा हा प्रकार २४ मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडला होता. या प्रकरणी गोल्डन पीस हॉटेल्स अ‍ॅण्ड रिसॉर्ट प्रा. लि.चे व्यवस्थापक ऋग्वेद आमोणकर यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

संशयित आरोपी पर्वरीतील हॉटेल निओ मॅजेस्टिक मधील मॅजेस्टिक पॅरेडाईस कॅसिनोमध्ये ग्राहक बनून आले होते. कॅसिनो खेळण्याचा बहाणा करुन त्यांनी २ लाख रुपये किमतीच्या कॅसिनो चिप्स चोरल्या. नंतर ते कॅसिनोतून बाहेर पडले आणि पणजी येथील मांडवीतील पॅरेडाईस कॅसिनोमध्ये गेले. तिथे या चिप्स त्यांनी एक्सचेंज करत २ लाख रुपये रोख रक्कम घेतली आणि ते तिथून पसार झाले.

चोरीचा हा प्रकार समजताच फिर्यादींनी पर्वरी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भा. न्या. सं.च्या ३०५ व ३(५) कलमान्वये गुन्हा नोंद केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरूण शिरोडकर हे करीत आहेत. 

हेही वाचा