पंचांनी फिरविलेला जबाब, पोलीस तपासातील त्रुटींमुळे फ्रेंच नागरिक निर्दोष

अमली पदार्थ प्रकरणी झाली होती अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20 hours ago
पंचांनी फिरविलेला जबाब, पोलीस तपासातील त्रुटींमुळे फ्रेंच नागरिक निर्दोष

पणजी : पंच साक्षीदाराने जबाब फिरविले, पोलीस स्थानकाचा सीलचा ताबा संशयास्पद, कपड्यांचे वर्णन जुळत नाही, तसेच पोलीस तपासातील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने २०१८ मध्ये १९ लाखांचा एलएसडी, कोकेन आणि चरस बाळगल्या प्रकरणातील संशयित स्टीफन हम्बर्ट या फ्रेंच नागरिकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. याबाबतचा आदेश म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश द्विज्पल पाटकर यांनी दिला.

हणजूण पोलिसांनी १७ जानेवारी २०१८ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, शापोरा येथे एक विदेशी नागरिक ड्रग्ज तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, तत्कालीन निवृत्त अधीक्षक सेराफीन डायस आणि उपअधीक्षक चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश सावंत व इतर पोलिसांनी ‌१७ जानेवारी २०१८ रोजी रात्री शापोरा येथे छापा टाकून स्टीफन हम्बर्ट याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून १३.६० लाख रुपये किमतीचे १३.६ ग्रॅम एलएसडी, ४.२९ लाखांचे ५३.७ ग्रॅम कोकेन आणि ६ हजारांचा ६ ग्रॅम चरस जप्त केला. या ड्रग्जची किंमत १७ लाख ९५ हजार ६०० रुपये होती. याशिवाय त्याच्याकडून ७ हजार ७० रोख रक्कम आणि ३,१८० युरो हे विदेशी चलन जप्त केले होते. त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती. हणजूण पोलिसांनी तपासपूर्ण करून ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने १३ नोव्हेंबर २०१८ सशर्त जामीन मंजूर केला.

न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन ८ जानेवारी २०२४ रोजी आरोप निश्चित करून खटला सुरू केला. स्टीफन हम्बर्ट याच्यातर्फे अॅड. कमलाकांत पोवळेकर यांनी बाजू मांडली.

छाप्यात वापरण्यात आलेला हणजूण पोलीस स्थानकाचा सीलच्या सुरक्षित ताब्याबाबतही मोठा घोळ समोर आला. पोलिसांचे म्हणणे होते की हणजूण पोलीस ठाण्याचा सील क्र. ५ छाप्यानंतर लगेच उपअधीक्षकांकडे ३० मे २०१८ पर्यंत सुरक्षित ठेवला होता. परंतु सील मुव्हमेंट रजिस्टरमधील नोंद क्र. ४ नुसार हाच सील ९ फेब्रुवारी २०१८ रोजी पोलीस निरीक्षकाने वापरल्याचे नमूद आहे. मात्र पोलिसांनी हा सील म्हापसा पोलीस स्थानकाचा असल्याचा दावा केला, पण रजिस्टरमध्ये म्हापशासाठी ‘एमपीएस’ असा स्पष्ट उल्लेख इतर ठिकाणी केल्याचे समोर आले. नोंद वहीमध्ये अनेक कोऱ्या नोंदी व खाडाखोड आढळल्याने सीलच्या ताब्यात फेरफार झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.

घटनास्थळापासून केवळ ७०-८० मीटरवर संशयिताचे घर असूनही घराची झडती दोन दिवसांनी म्हणजे १९ जानेवारी २०१८ रोजी घेतली. त्यासाठी फील्ड टेस्टिंग किट, सील, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर किंवा महिला अधिकारी नेले नाहीत. घर झडती पंचनाम्यावर संशयिताची सहीही नव्हती.

संशयिताला छाप्यापूर्वीच घरातून उचलल्याचा दावा करत त्याने अटकेच्या दिवशीचे हणजूण पोलीस स्थानकाचे सीसीटिव्ही फुटेज मागितले होते. मात्र पोलिसांनी हे महत्त्वाचे पुरावे न्यायालयात सादर केलेच नाहीत. अशा अनेक त्रुटींची दखल घेऊन न्यायालयाने संशयिताची निर्दोष सुटका केली.

साक्षीदाराची घटनास्थळी नव्हे, पोलीस स्थानकात सही

मुख्य पंच साक्षीदाराने पंचनाम्यावर घटनास्थळी नव्हे तर पोलीस स्थानकात सही केल्याचे सांगितले. मात्र, सरकारी वकिलांच्या उलटतपासणीत त्याने लगेच भूमिका बदलली आणि पंचनाम्यातील सर्व तपशील मान्य केले. तसेच संशयित परदेशी नागरिक असून सर्व कारवाई इंग्रजीत झाली होती. मात्र मुख्य पंच साक्षीदाराला इंग्रजी येत नसल्याचे त्यांनी स्वतः कबूल केले. 

हेही वाचा