कोकण रेल्वेची कामगिरी : ९३४ मोहिमांद्वारे ३७ हजार फुकट्यांवर कारवाई

मडगाव : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वेचा महसूल वाढवण्यासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून तिकीट तपासणीची मोहीम तीव्र करण्यात आली. त्यामुळे एप्रिल २०२६ या एकाच महिन्यात रेल्वेने विविध मोहिमांद्वारे तब्बल २.९० कोटी रुपयांचा दंड वसूल केला.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांतून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी उपाययोजना केल्या आहेत. यातच तिकीट तपासणी मोहिमाही राबवण्यात येतात व विनातिकीट प्रवास करणार्यांवर कारवाई केली जाते. त्यानुसार, एप्रिल २०२६ मध्ये कोकण रेल्वे मार्गावर एकूण ९३४ तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. या मोहिमांद्वारे ३७ हजार विनातिकीट प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून २.९० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. चौकट
गेल्यावर्षभरात २७.६८ कोटींचा दंड वसूल
कोकण रेल्वे मार्गावर गेल्या वर्षी २०२५-२६ या पूर्ण आर्थिक वर्षात कोकण रेल्वेने एकूण ११,३९४ विशेष तपासणी मोहिमा राबवल्या. या कालावधीत ४,९९,६७५ विनातिकीट प्रवासी आढळले. त्यांच्याकडून एकूण २७.६८ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कारवाई सुरुच राहणार
उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने कोकण रेल्वेने रेल्वे सुरक्षा बल आणि इतर रेल्वे अधिकार्यांच्या मदतीने पूर्ण मार्गावर ही मोहीम आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी अधिकृत तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.