अमेरिकन नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी २६ जणांना अटक

वास्को : वेर्णा पोलिसांनी एका बेकायदेशीर कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. हे कॉल सेंटर अमेरिकेच्या नागरिकांची फसवणूक करण्यात गुंतलेले असल्याचा आरोप आहे. गुरुवारी पहाटे वेर्णा औद्योगिक वसाहतीत टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी याप्रकरणी २६ जणांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे बेकायदेशीर रॅकेट वेर्णा औद्योगिक वसाहतीतील ‘मिलॅग्रोस ॲक्वा प्रा. लि.’ येथील प्लॉट क्रमांक ९८ मधील एका भाड्याच्या जागेतून चालवले जात होते. या ठिकाणी संशयित अमेरिकन बँकांचे अधिकारी असल्याचे भासवून परदेशी नागरिकांना फसव्या मार्गांनी पैसे हस्तांतरित करण्यास भाग पाडत होते.
हा छापा पहाटे ३ ते ६.१५ या वेळेत वेर्णा पोलीस ठाण्याच्या पथकाने टाकला. या पथकाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांनी केले, तर त्यांच्यासोबत उपनिरीक्षक महेश भोमकर, डेव्हिड कोस्टा, कॅरी फर्नांडिस, प्रिस्ली कार्व्हालो, सहाय्यक उपनिरीक्षक निवेद गावकर, हवालदार सुधीर तालेकर, अजित शिरोडकर, पोलीस शिपाई जगदेव धोत्रेकर, आकाश यादव, सादिक इंगलगुंडी आणि महिला पोलीस शिपाई सायली नाईक यांचा समावेश होता.
संशयित अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधताना आपली ओळख बँक अधिकारी म्हणून लपवण्यासाठी ‘व्हीपीएन कॉलिंग सिस्टीम’ आणि ‘स्पूफिंग तंत्रज्ञाना’चा वापर करत असत. विविध खोट्या सबबी सांगून, पीडितांना गिफ्ट कार्ड्सद्वारे पैसे हस्तांतरित करण्यास राजी केले जात असल्याचा आरोप आहे.
छाप्यादरम्यान, पोलिसांनी १४५ लॅपटॉप, ४५ मोबाईल फोन, राउटर्स, हेडफोन्स आणि गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेली इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. या मालमत्तेचे एकूण मूल्य सुमारे ५५ लाख रुपये इतके असल्याचा अंदाज आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी नागालँड, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र यांसारख्या विविध राज्यांचे रहिवासी आहेत. वेर्णा येथून हे बेकायदेशीर कॉल सेंटर चालवत असताना, ते सांकवाळ येथील ‘ओशन व्ह्यू अपार्टमेंट’मधील भाड्याच्या सदनिकांमध्ये वास्तव्यास होते.
वेर्णा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांच्या देखरेखीखाली, गुरुदास कदम यांच्या निगराणीखाली पार पडली.
संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
सर्व २६ संशयित आरोपींना वास्को येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास वेर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद एल. शिरोडकर करीत आहेत.