बेदरकारपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी क्रेटा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.

पणजी : कांपाल येथील मिलिटरी हॉस्पिटलजवळील इनर लेन रस्त्यावर गुरुवारी २८ मे रोजी सकाळी झालेल्या एका कार-दुचाकी अपघातातील गंभीर जखमी दुचाकी चालक संगीतकार फाउस्तो रॉड्रिग्ज (वय ६०, रा. मिरामार) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. या अपघातात त्यांच्या पत्नी मारिया रॉड्रिग्ज (वय ५५) या देखील गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी निष्काळजीपणे आणि धोकादायकरित्या कार चालवून अपघाताला कारणीभूत ठरल्याबद्दल पणजी पोलिसांनी ७६ वर्षीय कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हा अपघात गुरुवारी सकाळी १०:४३ वाजण्याच्या सुमारास कांपाल येथील पिंटो हाऊस जंक्शनजवळ घडला. संशयित कारचालक फ्रान्सिस्को झेवियर एन. सांताना फर्नांडिस (वय ७६, सांतीनेझ, पणजी) हा आपली पांढऱ्या रंगाची ह्युंदाई क्रेटा कार घेऊन आरोग्य संचालनालयाच्या मागच्या रस्त्यावरुन डॉ. ब्रागांझा परेरा रस्त्याच्या दिशेने जात होता. कार चालवत असताना त्याने वेगावर नियंत्रण न ठेवता अत्यंत हलगर्जीपणे आणि निष्काळजीपणाने गाडी चालवून समोरून जाणाऱ्या सुझुकी ॲक्सेस स्कूटरला (क्र. GA 07 AA 1954) डाव्या बाजूने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील रॉड्रिग्ज दाम्पत्य रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच पणजी पोलीस स्थानकाचे हवालदार समीर नाईक व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र, फाउस्तो रॉड्रिग्ज यांची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान त्यांचा प्राण वाचू शकला नाही. पणजी पोलिसांनी हवालदार समीर नाईक यांच्या तक्रारीवरून संशयित कारचालक फ्रान्सिस्को फर्नांडिस याच्याविरुद्ध बीएनएसच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.