नेपाळ सीमा ते गोव्याच्या किनाऱ्यांपर्यंत पसरलेल्या आंतरराज्य ड्रग्ज साम्राज्याचा पर्दाफाश!

गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखा आणि युपी एसटीएफच्या जाळ्यात 'असा' अडकला कुख्यात ड्रग्ज तस्कर 'मन्ना मलिक'

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
35 mins ago
नेपाळ सीमा ते गोव्याच्या किनाऱ्यांपर्यंत पसरलेल्या आंतरराज्य ड्रग्ज साम्राज्याचा पर्दाफाश!

पणजी : उत्तर प्रदेश-नेपाळच्या दुर्गम सीमाभागातून थेट आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असलेल्या गोव्याच्या किनारपट्टीपर्यंत पसरलेल्या एका अत्यंत धोकादायक आणि संघटित अंमली पदार्थ तस्करीच्या (Inter-state Drug Racket) नेटवर्कचा गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि उत्तर प्रदेशच्या विशेष कार्य दलाने (UP STF) अत्यंत शिताफीने पर्दाफाश केला आहे. गोव्यातील मालीम-बेती परिसरात काही दिवसांपूर्वी केलेल्या एका मोठ्या कारवाईची पाळेमुळे थेट भारत-नेपाळ सीमेवरील उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहेत. या संयुक्त मोहिमेत पोलिसांनी बहराइच येथील दर्गा शरीफ परिसरातून इखलाक अहमद उर्फ मन्ना मलिक या ड्रग्ज माफियाला अटक केली आहे. या आंतरराज्य टोळीच्या म्होरक्याच्या अटकेमुळे ड्रग्जच्या काळ्या बाजारातील एका मोठ्या पुरवठा साखळीला पोलिसांनी मोठा सुरुंग लावला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची थरारक सुरुवात गोव्यातील मालीम-बेती येथील मासळी मार्केट परिसरात झाली होती. गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, या भागात मोठ्या प्रमाणावर अत्यंत महागड्या अंमली पदार्थांची देवाणघेवाण होणार आहे. त्यानुसार, पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि जिवबा दळवी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली, निरीक्षक महेश गडेकर यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने बुधवार २० मे रोजी पहाटे ३:४० ते ६:३० दरम्यान या परिसरात सापळा रचला होता. पहाटेच्या अंधारात संशयास्पदरित्या दुचाकीवरून फिरणाऱ्या अर्जुन बिश्वकर्मा (वय ३६) आणि चेतकांत ओली (वय २५) या दोन नेपाळी युवकांना पोलिसांनी अडवले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ७.९७ लाख रुपये किमतीचे ३९.८८ ग्रॅम उच्च दर्जाचे हेरॉईन सापडले. पोलिसांनी हेरॉईन, दुचाकी आणि मोबाईलसह एकूण ८ लाख ८८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही नेपाळी तस्करांना अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) गजाआड केले.

गुन्हे शाखेने या दोन्ही नेपाळी संशयितांच्या कसून केलेल्या चौकशीत एका मोठ्या आंतरराज्य सिंडिकेटचा खुलासा झाला. गोव्यात पोहोचणाऱ्या या हेरॉईनचा मुख्य पुरवठादार उत्तर प्रदेशातील बहराइच येथील इखलाक अहमद उर्फ मन्ना मलिक असल्याचे तपासात समोर आले. गोव्यात नोंद असलेल्या या प्रकरणात मन्ना मलिक हे मुख्य नाव समोर आल्यानंतर, गोवा पोलिसांनी तातडीने उत्तर प्रदेश एसटीएफशी संपर्क साधून मदत मागितली.

युपी एसटीएफचे पोलीस उपअधीक्षक प्रमेश कुमार शुक्ला यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक चंद्र प्रकाश मिश्रा आणि त्यांच्या पथकाने मन्ना मलिकवर तांत्रिक पाळत ठेवली. ३० मे २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास, गोवा  गुन्हा शाखेचे निरीक्षक महेश गडेकर आणि उपनिरीक्षक माधव नाईक यांच्या संयुक्त पथकाने बहराइचच्या दर्गा शरीफ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मन्सूरगंज भागातून मन्ना मलिकला अत्यंत शिताफीने नाकाबंदी करून अटक केली. त्यानंतर रविवारी त्याला ट्रान्झीट  रिमांडवर गोव्यात आणले.

कोण आहे मन्ना मलिक ?

 मन्ना मलिक हा २०१२ पासून गुन्हेगारी जगतात सक्रिय असून त्याच्यावर खून, दरोडा, दरोड्याची पूर्वतयारी, प्राणघातक हल्ला आणि २०१४ मधील गँगस्टर ॲक्ट अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. बहराइच पोलिसांच्या रेकॉर्डवर त्याची २५-ए क्रमांकाची हिस्ट्री-शीट खुली आहे. २०१८ मध्ये तो 'वसीम उर्फ मिट्टी तेल' या स्थानिक दलालाच्या संपर्कात आला आणि तेथून त्याने अमली पदार्थांच्या व्यापारात उडी घेतली. त्यानंतर त्याने नेपाळमधील 'अर्जुन' नावाच्या मुख्य तस्कराशी संधान साधून हेरॉईनचा थेट पुरवठा मिळवणे सुरू केले. धक्कादायक बाब म्हणजे, हा माल बहराइचवरून थेट गोव्यात पाठवण्यासाठी तो कोणत्याही खाजगी वाहनाचा वापर न करता, सामान्य आंतरराज्य ट्रॅव्हल्स बस सेवेचा वापर करायचा, जेणेकरून पोलिसांना संशय येणार नाही. या मोठ्या कारवाईनंतर आता दोन्ही राज्यांचे पोलीस या नेटवर्कशी जोडलेल्या नेपाळ, उत्तर प्रदेश आणि गोव्यातील इतर संशयितांचा शोध घेत आहे.


हेही वाचा