चोरीच्या पैशातून 'जीवाचा गोवा' करणारा केरळचा भामटा कळंगूटमध्ये गजाआड!

केरळच्या कासारगोडमधील दागिन्याच्या दुकानात बनावट पेमेंट स्क्रीनशॉट दाखवून अंगठ्या आणि नेकलेस घेऊन झाला होता पसार. मुद्देमाल जप्त

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
just now
चोरीच्या पैशातून 'जीवाचा गोवा' करणारा केरळचा भामटा कळंगूटमध्ये गजाआड!

पणजी : आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेऊन दुकानदारांची फसवणूक करणाऱ्या आणि त्यानंतर पर्यटनाच्या नावाखाली गोव्यात येऊन ऐशआराम करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराचा गोवा पोलिसांनी अत्यंत फिल्मी स्टाईलने पर्दाफाश केला आहे. केरळमधील एका नामांकित दागिन्यांच्या दुकानात ऑनलाइन पेमेंट केल्याचा बनावट स्क्रीनशॉट दाखवून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या एका सराईत गुन्हेगाराला गोवा गुन्हे शाखेने (Crime Branch) कळंगुट येथील एका हाय-प्रोफाइल पार्टीमधून ताब्यात घेतले आहे. या सराईत चोराला शोधून काढत पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.



माहितीनुसार, केरळमधील कासरगोड जिल्ह्यात बाकेल पोलीस स्थानकात २७ मे २०२६ रोजी या सराईत गुन्हेगाराविरुद्ध विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने एका दागिन्यांच्या दुकानात ग्राहक बनून प्रवेश केला. अत्यंत चोखंदळपणे त्याने सोन्याच्या मौल्यवान अंगठ्या आणि एक सुबक नेकलेस निवडला. मात्र, पैसे देण्याची वेळ आल्यावर त्याने दुकानदाराच्या डोळ्यात धूळ फेकत आपल्या मोबाईलवर एक बनावट ऑनलाइन ट्रान्झॅक्शन यशस्वी झाल्याचे दाखवले आणि दुकानदाराला काही समजण्याच्या आत तो दागिन्यांसह गायब झाला.

केरळ पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला तपासादरम्यान या संशयिताची एक विशिष्ट 'मोडस ऑपेरेंडी' (गुन्हा करण्याची पद्धत) आढळून आली. हा सराईत चोर कुठेही मोठी चोरी किंवा फसवणूक केल्यानंतर थेट गोव्यात पळ काढायचा आणि तिथे कॅसिनो किंवा मोठ्या पार्ट्यांमध्ये चोरीचे पैसे उडवायचा. केरळ पोलिसांनी हा महत्त्वपूर्ण सुगावा गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिला. माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक (SP Crime) राहुल गुप्ता यांनी संपूर्ण गोव्यात हाय-अलर्ट जारी केला आणि तपासाची चक्रे वेगवान केली.

गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तगुरू सावंत यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक उपनिरीक्षक दिनेश पिकुळकर, हवालदार संदीप मडकईकर तसेच कळंगुट पोलीस स्थानकाचे हवालदार विद्यानंद आमोणकर, गणपत तिळोजी आणि आमिर गराड यांच्या एका विशेष पथकाने पणजी आणि कळंगुट परिसरातील सर्व प्रमुख कॅसिनो, पब आणि पार्टी क्लबच्या व्यवस्थापनाला संशयिताचे वर्णन देऊन सतर्क केले.

दरम्यान काल शनिवारी ३० मे रोजी पोलिसांना, सदर संशयित आरोपी कळंगुटमधील एका मोठ्या पार्टीत उपस्थित असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी वेषांतर करून त्या ठिकाणी वेढा घातला आणि तोच केरळमधील सराईत गुन्हेगार असल्याची पूर्ण खात्री पटताच त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. गोव्यात आधीच ठाण मांडून बसलेल्या केरळ पोलिसांच्या पथकाने संशयिताकडून चोरीला गेलेला नेकलेस आणि सोन्याच्या अंगठ्या हस्तगत केल्या आहेत.

या तपासात गोवा पोलिसांनी दाखवलेली कमालीची तत्परता, व्यावसायिकता आणि आंतरराज्य समन्वय पाहता, या केसवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून असलेल्या केरळमधील एका वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकाऱ्याने गोवा पोलिसांचे जाहीर आभार मानले असून त्यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे. केरळ पोलीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी संशयिताला घेऊन केरळला रवाना झाले आहेत.




हेही वाचा