बेळगावहून गोव्यात निघालेल्या सुवर्ण कारागिराला वाटेत गाठले; पिस्तुलाचा धाक दाखवून सोने लुटले

लाखोंचा मुद्देमाल जप्त; आठ जणांना अटक.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
24 mins ago
बेळगावहून गोव्यात निघालेल्या सुवर्ण कारागिराला वाटेत गाठले; पिस्तुलाचा धाक दाखवून सोने लुटले

जोयडा : बेळगावहून गोव्याकडे निघालेल्या एका सुवर्ण कारागिराला वाटेत अडवून, गावठी पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत २२५ ग्रॅम सोने आणि रोख रक्कम लुटल्याच्या खळबळजनक प्रकार नुकताच घडला. खानापूर पोलिसांनी आता या प्रकरणाचा छडा लावला आहे. या संपूर्ण गुन्ह्यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पीडित कारागिरासोबत कारमधून प्रवास करणारे त्याचे दोन अत्यंत विश्वासू मित्रच या संपूर्ण दरोड्याचे मुख्य सूत्रधार निघाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण आठ जणांच्या टोळीला अटक केली असून, त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरलेले बेकायदेशीर गावठी पिस्तूल आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ही घटना २० मे रोजी सायंकाळी उचवडे (ता. खानापूर) येथील बैलूर क्रॉस परिसरात घडली. पश्चिम बंगालमधील मूळ रहिवासी आणि सध्या बेळगाव येथील शहापूर परिसरात वास्तव्यास असलेले सुवर्ण कारागीर एस. के. इबादुल हे व्यावसायिक कारणास्तव आपले मित्र रबीउल गाझी आणि अलीहुसेन मंडल यांच्यासह कारने गोव्याच्या दिशेने जात होते.

कार बैलूर क्रॉसजवळ पोहोचली असता, आधीच पाळत ठेवून असलेल्या काही अज्ञात इसमांनी त्यांची कार अडवली. आरोपींनी कारमधील तिघांनाही बळजबरीने जवळच असलेल्या एका निर्जन शेतात नेले. तिथे त्यांना घेरून थेट पिस्तूल आणि तीक्ष्ण चाकूचा धाक दाखवण्यात आला. दरोडेखोरांनी सुरुवातीला इबादुल यांच्या जवळील १ लाख २०० रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेतली. त्यानंतर पूर्वनियोजित योजनेनुसार, आरोपींनी कारमध्ये सोबत असलेल्या रबीउल गाझी याच्याकडून २२५ ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत केले आणि जंगलाचा फायदा घेत पोबारा केला. 

सुरुवातीला हा गुन्हा एखाद्या बाहेरील अट्टल दरोडेखोरांच्या टोळीने केल्याची शंका पोलिसांना होती. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून खानापूर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान, संशयितांचे मोबाईल कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) आणि त्यांच्या संशयास्पद हालचालींचे बारकाईने विश्लेषण केले. या तांत्रिक तपासात पोलिसांना प्रवासादरम्यान कारमध्ये उपस्थित असलेल्या रबीउल आणि अलीहुसेन यांच्यावर संशय आला. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनीच आपल्या इतर ६ साथीदारांच्या मदतीने हा दरोड्याचा कट रचल्याची कबुली दिली. एखाद्या क्राईम थ्रीलर चित्रपटाची स्क्रिप्ट देखील फॉल ठरेल अशी ही घटना होती. 

या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत रबीउल गाझी, अलीहुसेन मंडल, सादिक तोरगल, विवेक पाटील, प्रशांत चव्हाण, नितीन चव्हाण, दिगंबर पाटील आणि मयूर घाडी अशा एकूण आठ जणांना अटक केली आहे. बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक यांच्या थेट मार्गदर्शनाखाली खानापूर पोलीस पथकाने अवघ्या काही दिवसांत या गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. या गुन्ह्यामागील आर्थिक व्यवहारांची पाळेमुळे शोधण्यासाठी पोलीस सध्या संशयितांची अधिक चौकशी करत आहेत.

हेही वाचा