गोवा घटकराज्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा!

पणजी : गोवा घटकराज्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना गोव्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक योगदानाचे विशेष कौतुक केले आहे. गोवा हा प्रत्येक भारतीयाच्या हृदयातील एक विशेष प्रदेश असून, त्याची समृद्ध संस्कृती, वारसा, अध्यात्म, संगीत, खाद्यसंस्कृती आणि पर्यटन क्षेत्रातील योगदान देशासाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधानांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठवलेल्या शुभेच्छा पत्रात गोव्याच्या सुंदर किनारपट्टी, समृद्ध जैवविविधता, ऐतिहासिक मंदिरे आणि चर्च यांचा उल्लेख केला. तसेच काही वर्षांपूर्वी गोव्यात सापडलेल्या संत राणी केतेवान यांच्या अवशेषांचे जॉर्जियामध्ये झालेल्या भावनिक स्वागताची आठवणही त्यांनी करून दिली.
शिक्षण, वैद्यकीय, उद्योजकता, कला, क्रीडा आणि सार्वजनिक सेवेसह विविध क्षेत्रांत गोमंतकीयांनी उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे सांगत मोदी यांनी गोव्याच्या सागरी परंपरा, पर्यटन उद्योग आणि सांस्कृतिक प्रसारामुळे भारताची जागतिक प्रतिमा अधिक मजबूत झाल्याचे नमूद केले.
स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याला मानवंदना
गोवा मुक्तीसाठी लढलेल्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करताना त्यांनी त्यांच्या शौर्याला मानवंदना दिली. गोवा मुक्तीचा इतिहास हा स्वतंत्र भारताच्या गौरवशाली अध्यायांपैकी एक असून; राष्ट्रीय एकात्मता आणि स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. डिसेंबर २०२१ मध्ये गोवा मुक्तीदिनानिमित्त शहीद स्मारकाला दिलेल्या भेटीची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
गोमंतकीयांकडे प्रचंड ऊर्जा व आशावाद
गोव्याला दिलेल्या अनेक भेटींमुळे राज्याबद्दलचा आदर अधिक वाढल्याचे सांगत मोदी यांनी दिवाळीच्या काळात गोवा-कारवार किनारपट्टीवरील नौदल जवानांसोबत घालवलेले क्षण आणि श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या ५५० व्या वर्धापनदिन सोहळ्यातील सहभागाचा उल्लेख केला. गोव्याच्या तरुण उद्योजकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, मच्छीमारांमध्ये आणि महिला शक्तीमध्ये प्रचंड ऊर्जा व आशावाद असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
मुख्यमंत्री व त्यांच्या टीमचे अभिनंदन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करताना पंतप्रधानांनी राज्याने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. विशेषतः ‘ स्वयंपूर्ण गोवा’ उपक्रमाचा उल्लेख करत त्यांनी स्थानिक समुदायांचे सक्षमीकरण आणि तळागाळातील सुशासन बळकट करण्यासाठी हा उपक्रम आदर्श ठरल्याचे म्हटले. स्वयंपूर्ण मित्रांनी गावागावांत विकासाची फळे पोहोचविण्यासाठी केलेल्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले.
‘पर्पल फेस्टिव्हल’चा उल्लेख
‘मन की बात’ कार्यक्रमात गोव्याच्या ‘पर्पल फेस्टिव्हल’चा उल्लेख केल्याचे सांगत त्यांनी हा उत्सव समावेशक विकास आणि दिव्यांग बांधवांच्या सन्मानाचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे नमूद केले. तसेच नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये जनतेने एनडीएच्या सुशासन आणि विकासाच्या अजेंड्यावर पुन्हा विश्वास दाखविल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
गोव्याच्या विकासासाठी केंद्राकडून पाठबळ
केंद्र सरकारकडून गोव्याच्या विकासासाठी सातत्याने पाठबळ दिले जात असल्याचे स्पष्ट करत मोदी यांनी पायाभूत सुविधा, आरोग्य, गृहनिर्माण, पर्यटन, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती क्षेत्रांत मोठी मदत दिल्याचे सांगितले. गेल्या वर्षभरातच गोव्यासाठी १० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी महामार्ग, पर्यटन पायाभूत सुविधा, सिंचन, उच्च शिक्षण आणि शहरी विकास प्रकल्पांसाठी मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली.
पंतप्रधान आवास योजनेमुळे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण
पंतप्रधान आवास योजनेमुळे हजारो कुटुंबांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण झाले असून; मनोहर सेतू आणि मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे व्यापार आणि दळणवळणाला चालना मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
‘उल्लास’ उपक्रमांतर्गत गोव्याने पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करून देशातील आघाडीच्या राज्यांमध्ये स्थान मिळविल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शिक्षण, जनजागृती आणि मानवी विकासाला दिलेल्या प्राधान्याचे हे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले.
२०४७ पर्यंत विकसित भारताच्या निर्मितीत ‘विकसित गोवा’ची भूमिका महत्त्वपूर्ण
२०४७ पर्यंत विकसित भारताच्या निर्मितीत ‘विकसित गोवा’ची महत्त्वपूर्ण भूमिका असेल, असा विश्वास व्यक्त करत मोदी यांनी शाश्वत विकास, स्वच्छ ऊर्जा, सागरी अर्थव्यवस्था, डिजिटल नवकल्पना, स्टार्टअप परिसंस्था, कौशल्य विकास, हरित पायाभूत सुविधा आणि आरोग्य पर्यटन या क्षेत्रात गोव्यासाठी मोठ्या संधी असल्याचे सांगितले.
गोव्याची ओळख जपणे केंद्रस्थानी असणे गरजेचे
गोव्याची पर्यावरणीय समतोलता आणि सांस्कृतिक ओळख जपणे हे विकास प्रक्रियेचे केंद्रस्थान राहिले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. क्रीडा क्षेत्रातही गोव्याकडे मोठी क्षमता असून; २०२३ मधील ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन आणि अलीकडील आयर्नमॅन स्पर्धेतील युवकांचा उत्स्फूर्त सहभाग याचा विशेष उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. बीच गेम्सच्या क्षेत्रातही गोवा देशाचे नेतृत्व करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेवटी, गोवा प्रगती आणि नवोन्मेषाची नवी शिखरे गाठत राहील, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा घटकराज्य दिनानिमित्त गोव्यातील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या.