‘फातोर्डा’ बनला गोव्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू

भाजप, कॉंग्रेस, गोवा फॉरवर्डच्या गोवा अध्यक्षपदाची धुरा फातोर्डातील नेत्यांकडे

Story: भास्कर देसाई। गोवन वार्ता |
7 mins ago
‘फातोर्डा’ बनला गोव्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू

पणजी : गोव्यातील राजकारणात सध्या एक वेगळाच योग जुळून आला आहे. फातोर्डा विधानसभा मतदारसंघ गोव्यातील राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू बनला आहे. भारतीय जनता पार्टीचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, कालच कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बनलेले गिरीश चोडणकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे (Goa Forward Party) राज्य अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई हे फातोर्डा मतदारसंघातील निवासी आहेत. त्यामुळे या मतदारसंघाला गोव्याच्या राजकारणात खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.

आमदार विजय सरदेसाई आणि माजी आमदार दामू नाईक यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवून प्रतिनिधीत्व केले आहे. गिरीश चोडणकर यांनी फातोर्डातून विधानसभा निवडणूक लढवली नसली तरी या मतदारसंघात वास्तव्यास आहेत.  कॉंग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेले चोडणकर पक्षाचे काम करताना फातोर्डासहीत गोव्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमीका बजावत आले आहेत. 

तिन्ही नेत्यांसमोर विधानसभा निवडणुकीचे आव्हान 

तामीळनाडूचे कॉंग्रेस पक्षाचे (Congress Party) प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे गिरीश चोडणकर यांची गोव्याच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्याचा पक्षाचा आदेश येताच या वेगळ्या योगायोगाची चर्चा सुरू झाली आहे. युवा दशेतच गोव्यातील राजकारणात येऊन जम बसवत आपली वेगळी ओळख निर्माण केलेले हे तिन्ही नेते सध्या प्रमुख पक्षाचे गोवा अध्यक्ष आहेत. साधारण आठ महिन्यावर येऊन ठेपलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीचे आव्हान तिन्ही नेत्यांसमोर आहे. मात्र, राजकारणात मुरलेले असल्याने ते हे आव्हान पेलणार असे त्यांचे जवळचे सांगतात. भाजप, कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड या तिन्ही पक्षाचे अध्यक्ष फातोर्डा मतदारसंघातील असल्याने या मतदारसंघाला आता वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुढील काही महिने फातोर्डा विधानसभा मतदारसंघ कायम चर्चेत राहणार आहे. येथील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. 

दामू नाईक यांनी लढवली पाच वेळा निवडणूक 

भाजपचे (BJP)  प्रदेशाध्यक्ष तथा फातोर्डा मतदारसंघाचे माजी आमदार दामू नाईक यांनी या मतदारसंघातून तब्बल पाच वेळा विधानसभा निवडणूक लढवली. २००२ व २००७ साली निवडून आले तर २०१२, २०१७ व २०२२ च्या निवडणुकीत विजयाने हुलकावणी दिली. या तिन्ही निवडणुकीत विजय सरदेसाई वरचढ ठरले व विजयी झाले.

आमदार सरदेसाई चार वेळा रिंगणात 

आमदार विजय सरदेसाई यांनी चार वेळा निवडणूक लढवली. एकदा पराभव स्वीकारावा लागला तर तीन वेळा विजय मिळवला. २००७ साली सरदेसाई यांनी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर फातोर्डा मतदारसंघातून प्रथम निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजपचे दामू नाईक यांची सरशी झाली. २०१२ साली अपक्ष म्हणून निवडणूक लढवली व विजय मिळवला. त्यानंतर गोवा फॉरवर्ड पक्ष स्थापन करून २०१७ व २०२२ची निवडणूक लढवली व फातोर्डा मतदारसंघातील विजयी घोडदौड कायम ठेवली. 

गिरीश चोडणकर यांचे फातोर्डाकडे विशेष लक्ष 

गिरीश चोडणकर यांनी फातोर्डा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली नाही. तरीही विविध पदांवर कॉंग्रेस पक्षाचे संघटनात्मक काम करताना या मतदारसंघातील निवासी म्हणून त्यांचे या मतदारसंघाकडे विशेष लक्ष होते. अनेक वेळा त्यांचे फातोर्डा मतदारसंघातील उमेदवारीसाठी नाव पुढे आले. मात्र, उमेदवारी मिळाली नाही. तरीही गिरीश चोडणकर यांनी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून आपले काम सुरूच ठेवले. मात्र २००२ साली शेजारच्या मडगाव विधानसभा मतदारसंघातून विद्यमान सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली. दिगंबर कामत या निवडणुकीत विजयी झाले. 

‘तीन चाव्या’ फातोर्डा मतदारसंघाकडे 

एकूण गोव्यातील राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवलेले हे तिन्ही नेते आज आपल्या पक्षाचे गोवा राज्यस्तरीय अध्यक्ष आहेत. त्यामुळेच गोव्यातील राजकारणाच्या तीन प्रमुख चाव्या सध्या फातोर्डा मतदारसंघाकडे आहेत; असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 



हेही वाचा