केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची युवा काँग्रेसची मागणी

मडगावात ‘नीट’ पेपर घोटाळाप्रकरणी निदर्शने


5 mins ago
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची युवा काँग्रेसची मागणी

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करताना काँग्रेसचे कार्यकर्ते.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : ‘नीट’ पेपर लिक झाल्याने देशातील मुलांचे भविष्य खराब झाले आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस लढा देईल व लढा जिंकेल. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी दिला. गोवा प्रदेश युवा काँग्रेसतर्फे मडगाव येथील आयनॉक्सच्या नजीक शुक्रवारी ‘नीट’ घोटाळाप्रकरणी निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, युवा अध्यक्ष अर्चित नाईक, युवा राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आयनॉक्सकडून भाजपच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढून ‘नीट’ घोटाळ्याचा निषेध नोंदवण्यात आला.
भाजप युवकांच्या भविष्याशी खेळत आहे. पेपर लिकमुळे अनेक मुलांना नैराश्याचा सामना करावा लागला. याची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माणिकराव ठाकरे यांनी केली. खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस म्हणाले की, महाराष्ट्र, हरयाणा, उत्तरप्रदेश व बिहार या भाजपशासित प्रदेशात ‘नीट’चे पेपर आढळले आहेत. राजस्थान, बिहारच्या शिक्षणमंत्र्यांची वक्तव्ये भाजपची विचारसरणी दर्शवतात. या सर्व प्रकारांविरोधात लढा उभारणे गरजेचे आहे. गोव्यातही शिक्षण क्षेत्र वाचवण्याची गरज आहे.      

हेही वाचा