मडगावनंतर आता शिवोलीत थारचा अपघात; तीन दिवसांतील ही दुसरी मोठी घटना.

पणजी : गोव्यातील रेंट अ कॅब वाहनांच्या बेजबाबदार आणि भरधाव वेगामुळे निष्पाप स्थानिकांचे बळी जाण्याचे सत्र सुरूच असून, शिवोली येथे शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका स्थानिक युवकाचा जागीच मृत्यू झाला.
शिवोली येथील फर्नांडिसवाडा, मार्ना येथे सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास 'रेंट अ कॅब' थारने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार संकेत सूर्यकांत दाभोळकर (वय ३४, रा. दांडा, शिवोली) हा युवक जागीच ठार झाला, तर त्याच्यासोबत असलेला निश्चल मोरजकर (वय १४, रा. हणजूण) हा अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमी मुलावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित थार चालक व्हाय. कृष्णन (मूळ केरळ) हा चोपडेहून दांडाच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या स्कूटरला त्याने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी भीषण होती दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले आणि संकेतचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, संशयित थार चालकाला ताब्यात घेतले आहे.
चिंतेची बाब म्हणजे, गोव्यात गेल्या तीन दिवसांतील थार जीपचा दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी मडगाव येथील शिर्ली येथे एका भरधाव थारने महिला दुचाकीस्वाराला धडक देऊन गंभीर जखमी केले होते. त्या प्रकरणातील महाराष्ट्रातील संशयिताला गोवा पोलिसांनी अटक करून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला.