
पणजी : पीडब्ल्यूडी कामगार पुरवठा सोसायटीने काही दिवसांपूर्वी ४५० पदे भरण्याबाबत जाहीरात दिली आहे. मात्र ही सर्व पदे रोजंदारी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. असे करणे गोमंतकीय युवकांची थट्टा आहे. ही सर्व पदे कायमस्वरूपी भरावीत अथवा भरती प्रक्रिया पूर्णपणे रद्द करावी; अशी मागणी कामगार नेते ॲड. अजय प्रभुगावकर यांनी केली. शुक्रवारी त्यांनी भरती प्रक्रिया रद्द करण्याबाबत खात्यातील अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी संघटनेतील अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
ॲड. प्रभूगावकर यांनी सांगितले की, सोसायटीमध्ये या आधीच सुमारे अडीच हजार कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपावर नेमले आहेत. यातील काही कर्मचारी तर निवृत्तीच्या जवळ पोहोचले आहेत. काही कर्मचारी नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे डेटा ऑपरेटर, बिलिंग क्लर्क अशी कामे करत आहेत. मात्र त्यांना नियमित कर्मचाऱ्यांपेक्षा कमी वेतन मिळते. अशा कर्मचाऱ्यांना कायम करावे आणि तोपर्यंत नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे या मागण्यांसाठी आम्ही अनेक वर्षे आंदोलन करत आहोत. याबाबत आमची सरकारसोबत चर्चा सुरू आहे. ही परिस्थिती माहिती असताना देखील रोजंदारी पद्धतीने भरतीसाठी जाहीरात देणे चुकीचे आहे.
ते म्हणाले, कंत्राटी पद्धतीने भरती झाल्यास गोमंतकीय युवकांना कोणताही फायदा होणार नाही. मंत्री २२ हजार सरकारी पदे रिक्त असल्याचे सांगतात. मात्र जागा भरताना मात्र रोजंदारी पद्धतीची निवड केली जाते. सरकारने २२ हजार रिक्त पदे रोजंदारीने भरली जाणार आहेत का? हे स्पष्ट करावे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवकांना सरकारी नोकरीचे गाजर दाखवण्यात आले आहे. रोजंदारीवर काम केल्यास युवक लाचार होतील. युवकांनी या जाहिरातीला बळी पडू नये. आता नोकरी मिळाली तरी सरकार या युवकांना कधीही नियमित करणार नाही.