जुने गोवा येथील हेलिपॅडच्या माध्यमातून ‘हेली पर्यटना’ला देणार चालना

ऑपरेटरच्या नियुक्तीसाठी मागवले प्रस्ताव : आग्वाद, तेरेखोल किल्ला, दुधसागर धबधबा, पर्तगाळी मठाचे घडविणार दर्शन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th May, 11:48 pm
जुने गोवा येथील हेलिपॅडच्या माध्यमातून ‘हेली पर्यटना’ला देणार चालना

पणजी : पर्यटन खात्याकडून राज्यातील हेली पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केंद्राच्या स्वदेश दर्शन योजने अंतर्गत जुने गोवा येथे बांधण्यात आलेली हेलिपॅड सुविधेची देखभाल, व्यवस्थापन आणि येथे हेलिकॉप्टर राईड उपलब्ध करून देण्यासाठी ऑपरेटरची नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबत खात्याने प्रस्ताव मागवले आहेत. एजन्सीला येथून आग्वाद किल्ला, तेरेखोल किल्ला, दुधसागर धबधबा, मोप विमानतळ आणि पर्तगाळी मठ येथे हेलिकॉप्टर राईड उपलब्ध करून द्याव्या लागतील.
निवड झालेल्या ऑपरेटरला वरील मार्गांशिवाय पर्यटकांच्या मागणीनुसार अन्य मार्गांवर देखील राईड उपलब्ध करून देता येणार आहेत. मात्र यासाठी आवश्यक परवाने घेणे गरजेचे करण्यात आले आहे. हेलिकॉप्टरची क्षमता ५ प्रवाशांची किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. हवामान योग्य असल्यास ऑपरेटरला वर्षातून किमान १५० दिवस अशा राईड उपलब्ध करून द्याव्या लागतील. राईडसाठी ऑनलाइन, ऑफलाईन बुकिंग सुविधा, टोल फ्री क्रमांक असणे आवश्यक आहे. ऑपरेटरला हेलिपॅड सुविधा खासगी हेलिकॉप्टरला उपलब्ध करून देता येईल.
ऑपरेटरला हेली पॅडच्या ठिकाणी मूलभूत सुविधा, सुरक्षा ,आपत्कालीन उपाययोजना उपलब्ध करून द्याव्या लागतील. त्याला तिकीट काउंटर, वेटींग रूम, शौचालय, मेटल डिटेक्टर, पार्किंग, व्हीआयपी लाँज आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. सरकारी कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टरसाठी येथे एक हेलिकॉप्टर पार्किंग जागा आरक्षित ठेवावी लागेल. यासाठी कोणतेही शुल्क आकारता येणार नाही. ऑपरेटला डीजीसीए व अन्य खात्याच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हेलिपॅड परिसरात हेलिकॉप्टर प्रशिक्षण वर्ग, फूड कोर्ट व अन्य सुविधा सुरू करता येतील.
ऑपरेटरला पोलीस, अग्निशामक दल, नौदल, डीजीसीए, आरोग्य आणि एफडीएची परवानगी घ्यावी लागेल. येथे परवानगीशिवाय अन्य कोणतेही उपक्रम राबवता येणार नाहीत. ऑपरेटरला दहा वर्षांसाठी परवाना देण्यात येईल. परवाना शुल्कत दर तीन वर्षांनी वाढ करण्यात येईल. याआधी जीटीडीसीतर्फे येथे २०२३ मध्ये येथे हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली होती. तेव्हा याचे दर दहा मिनिटांच्या राईडसाठी ८ हजार रुपये ठरवण्यात आले होते. त्यावेळी ही सेवा जुने गोवा ते मोपा आणि दाबोळी विमानतळावर देण्यात आली होती.             

हेही वाचा