यंदा सरासरी पेक्षा कमी मान्सूनची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
8 hours ago
यंदा सरासरी पेक्षा कमी मान्सूनची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

पणजी : प्रशांत महासागरात अल निनो वातावरणीय प्रणाली निर्माण होण्याची शक्यता असल्याने यंदा राज्यासह संपूर्ण देशात सरासरी पेक्षा कमी मान्सूनची शक्यता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) व्यक्त केली आहे. याबाबत खात्याने आज मान्सूनचा दुसरा लांब पल्ल्याचा अंदाज जारी केला आहे. याआधीच्या अंदाजात मान्सून सरासरीपेक्षा ९२ टक्के असण्याची शक्यता व्यक्त केली होती. नवीन अंदाजात ती ९० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. अल निनोच्या कालावधीत देशात मान्सूनचे प्रमाण कमी होते. 

खात्याच्या दुसऱ्या अंदाजानुसार, प्रशांत महासागरातील ‘ला निना' परिस्थीती सध्या कमजोर होत आहे. काही महिन्यात ती एन्सो न्युट्रल होण्याची शक्यता आहे. यानंतर मान्सून कालावधीत ' अल निनो' परिस्थीती निर्माण होण्याच्या शक्यता आहे. अल निनो मान्सूनसाठी पूरक नसते. खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरी पेक्षा अती जास्त पाऊस पडण्याची शक्यता शून्य टक्के आहे. 

याशिवाय सरासरी हून अधिक पावसाची शक्यता २ टक्के, सरासरी एवढीच पावसाची शक्यता १४ टक्के आहे. सरासरी पेक्षा कमी पावसाची शक्यता २४ तर अत्यल्प पावसाची शक्यता ९० टक्के आहे. खात्यातर्फे विविध वातावरणीय घटकांचा आणि मॉडेल्सचा अभ्यास करून मान्सून विषयक लांब पल्ल्याचा अंदाज जाहीर केला जातो. गोव्यात जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. तसेच कमाल आणि किमान तापमान सरासरी पेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा