नोकरभरती आयोगाबाबत आमदारांची नाराजी

सरकारी नोकरभरती, विकासकामांवर सत्ताधारी आमदारांच्या बैठकीत खडाजंगी


8 mins ago
नोकरभरती आयोगाबाबत आमदारांची नाराजी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सरकारी नोकरभरती प्रक्रियेवरून सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. अनेक आमदारांनी कर्मचारी भरती आयोगामार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करून पूर्वीप्रमाणे संबंधित खात्यांमार्फत भरती करण्याची मागणी केली.
पणजीतील एका हॉटेलमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीत आमदार देविया राणे आणि डिलायला लोबो यांनी सरकारी नोकऱ्यांचे समान वाटप व्हावे, अशी मागणी केली. काही मतदारसंघांना अधिक नोकऱ्या मिळतात, तर काहींना फारच कमी संधी मिळतात, असे मतही काही आमदारांनी बैठकीत मांडले. सध्या कर्मचारी भरती आयोगामार्फत सरकारी नोकरभरती प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत १,५०० पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. आणखी ३,५०० पदांची भरती प्रक्रिया प्रस्तावित आहे.
बैठकीत विविध मतदारसंघांतील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. शिवोली मतदारसंघात पाणीटंचाई कायम असल्याची तक्रार आमदार डिलायला लोबो यांनी मांडली. रस्ते व इतर प्रकल्प वेळेत पूर्ण होत नसल्याबद्दलही अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली.
दामू नाईक यांचे स्पष्टीकरण
ही बैठक मतदारसंघांतील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी होती. प्रलंबित कामांची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. निवडणुका किंवा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले.
शिरोड्यातील राजकारणावरून तणाव
बैठकीत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी मगो पक्षावर थेट टीका केली. मगोने शिरोडा मतदारसंघात हस्तक्षेप करू नये. अन्यथा आम्हालाही प्रत्युत्तर द्यावे लागेल, असा इशारा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिला. यावर मगोचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.
विविध कारणांमुळे काही आमदार गैरहजर
सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत हे विदेशात आहेत. विश्वजीत राणे आणि बाबूश मॉन्सेरात गोव्याबाहेर आहेत. आलेक्स सिक्वेरा आणि जेनिफर मॉन्सेरात हे प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. अनुपस्थित राहिलेल्या आमदारांनी तशी पूर्वकल्पना दिली होती, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली.

हेही वाचा