अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याचे प्रकरण; पाचही संशयितांना ५ दिवसांची पोलीस कोठडी

मुंगूल गँगवॉरमध्ये सहभाग असल्याचा दाखला देत संशयितांच्या जामीन अर्जाला विरोध करत फातोर्डा पोलिसांची न्यायालयात मागणी.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
8 mins ago
अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याचे प्रकरण; पाचही संशयितांना ५ दिवसांची पोलीस कोठडी

मडगाव : मडगाव येथील कदंब बस स्थानकानजीक जुन्या वादातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला पाच जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून पाचही संशयितांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सर्व संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलाचा भाऊ शादाफ बुडेल मुल्ला (वय १९, रा. घोगळ हाउसिंग बोर्ड) याने फातोर्डा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास संशयित प्रकाश रमणा वेल्मा (रा. नेसाय), श्लोक संजय शिंदे (वय २२, रा. नावेली), मैफुज अस्लम सय्यद (वय २१, रा. नावेली), सुनील बिलावर (वय २०, रा. घोगळ, हाउसिंग बोर्ड) आणि अक्षय पुंडलिक तलवार (रा. बोर्डा) यांनी पूर्ववैमनस्यातून संगनमताने पीडित मुलाला गाठले. त्यानंतर संशयितांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.

फातोर्डा पोलिसांनी या पाचही संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि 'गोवा बाल कायदा' (Goa Children's Act) अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. दरम्यान, फातोर्डा-मुंगूल येथे ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या गँगवॉर प्रकरणातही संशयित प्रकाश वेल्मा, सुनील बिलावर आणि अक्षय तलवार यांचा सहभाग होता. पाचही संशयितांना मडगाव प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले.  पोलिसांनी न्यायालयात या संशयितांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध करत तो रद्द करण्याची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य धरत सर्व संशयितांची पाच दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

हेही वाचा