'लुटेरी दुल्हन' असल्याचा पतीचा गंभीर आरोप

सुरत : पत्नीकडून होणारा छळ आणि पोलिसांच्या उदासीनतेमुळे हताश झालेल्या गुजरात मधील सुरत येथील एका व्यक्तीने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. कायदेशीर लढाई आणि तीव्र मानसिक त्रासामुळे जगायची इच्छा राहिलेली नाही, असे म्हणत किरीट पटेल यांनी सुरत जिल्हाधिकारी कार्यालयात रीतसर अर्ज दाखल केला आहे.
'इंडिया टुडे'च्या अहवालानुसार, किरीट पटेल आणि त्यांच्या पत्नी या दोघांचेही हे तिसरे लग्न आहे. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच पत्नी, सासू आणि सासरच्या मंडळींनी पैशांसाठी छळ सुरू केला. घरगुती वाद उकरून काढून पत्नी महिला सुरक्षा कायद्यांचा गैरवापर करायची आणि पोलिसांत खोट्या तक्रारी द्यायची, असा आरोप पटेल यांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे, पत्नीने पूर्वाश्रमीच्या पतींनाही अशाच धमक्या देऊन पैसे उकळले असून ती कायदेशीर फेऱ्यात अडकवून पैसे वसूल करणारी 'लुटेरी दुल्हन' आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच पहिल्या पत्नीपासून असलेल्या मुलाला तिसऱ्या पत्नीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही, अशीही त्यांची तक्रार आहे.
आपल्या इच्छामरणाच्या अर्जात पटेल यांनी कौटुंबिक वादाचा सामना करणाऱ्या पुरुषांसाठी कायदेशीर संरक्षणाचा अभाव असल्याबद्दल तीव्र संताप आणि निराशा व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, पोलीस ठाणे आणि सरकारी कार्यालयांचे उंबरठे वारंवार झिजवूनही त्यांना केवळ आश्वासने मिळाली, कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. सुरत जिल्हाधिकारी कार्यालयाचा अधिकृत शिक्का असलेल्या या अर्जात त्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली असून, या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आता कोणताही दुसरा मार्ग उरलेला नाही, असे म्हटले आहे.
पटेल यांनी असा इशाराही दिला आहे की, जर त्यांच्या तक्रारींचे ठरावीक वेळेत निवारण झाले नाही, तर ते स्वतः एखादे टोकाचे पाऊल उचलतील. प्रशासनाने अद्याप या आरोपांवर किंवा इच्छामरणाच्या विनंतीवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
या प्रकरणामुळे मानसिक आरोग्य, वैवाहिक वादात पुरुषांना उपलब्ध असलेले कायदेशीर पर्याय आणि कौटुंबिक कलहाशी संबंधित तक्रारी हाताळण्याची पद्धती यावर एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. अधिकारी आता पटेल यांनी सादर केलेल्या अर्जाची तपासणी करतील आणि कायद्यानुसार पुढील कारवाई करतील अशी अपेक्षा आहे.