ब्लू इकॉनॉमी, शाश्वत विकासात गोवा देशात आदर्शवत : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

४० वा घटकराज्य दिवस साजरा

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
24 mins ago
ब्लू इकॉनॉमी, शाश्वत विकासात गोवा देशात आदर्शवत : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

पणजी : ब्लू इकॉनॉमी आणि शाश्वत किनारी विकासात गोवा राज्य आघाडीवर असून भविष्यातही राहील. या दोन्ही क्षेत्रांत गोवा देशातील इतर राज्यांसाठी एक आदर्शवत राज्य आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. गोव्याच्या ४० व्या घटकराज्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल अशोक गजपती राजू, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर, खासदार सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह इतर मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.

उपराष्ट्रपती राधाकृष्णन पुढे म्हणाले की, भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या अर्थव्यवस्थेला अनन्यसाधारण महत्त्व येणार आहे. यात नील अर्थव्यवस्था मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकते. विकास हा नेहमीच शाश्वत आणि सर्वसमावेशक असायला हवा. समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेतले, तरच त्याला खरा विकास म्हणता येईल. गोव्यातील पर्यावरण, राखीव जंगले, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक वारसा जपणे ही केवळ स्थानिकांचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची राष्ट्रीय जबाबदारी आहे. जगाच्या नकाशावर गोव्याची ओळख केवळ एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून नाही, तर येथील निसर्ग आणि मानवामधील सुदृढ एकोप्यामुळे आहे.

पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नैसर्गिक समतोल राखून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. स्वतःची अस्मिता आणि ओळख जपूनही आधुनिक विकास साधता येतो, हे गोव्याने संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. गोव्याने आपल्या समृद्ध सांस्कृतिक मुळांचे जतन करत आधुनिकतेचा स्वीकार केला आहे. गेल्या काही वर्षांत गोव्याने पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि डिजिटल प्रशासन (ई-गव्हर्नन्स) क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेषतः गोव्यातील पारदर्शक नोकरभरती प्रक्रिया अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. येथील युवकांनी आपला हा गौरवशाली वारसा पुढे चालवला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोव्यासह सर्वच राज्यांचा समतोल विकास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

तत्पूर्वी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्याची वेगळी ओळख, अस्मिता आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे आम्ही मनापासून आभार मानतो. गेल्या बारा वर्षांच्या कालावधीत गोव्यात अनेक ऐतिहासिक विकासकामे झाली आहेत. भाजपच्या 'डबल इंजिन' सरकारमुळेच हे शक्य झाले. अन्यथा गोव्यासारख्या भौगोलिकदृष्ट्या लहान राज्यात एवढ्या कमी वेळेत इतकी मोठी विकासकामे पूर्ण करणे शक्य झाले नसते. आम्ही यापुढेही गोव्यातील ही सामाजिक एकता आणि विकास कायम ठेवण्यासाठी कटिबद्ध राहू.

पर्यावरण जपणे आवश्यक : राज्यपाल

राज्यपाल अशोक गजपती राजू म्हणाले की, "गोव्याला देशातील एक सर्वोच्च आदर्श राज्य बनवण्याची मोठी संधी आहे. मात्र, हा विकास साधताना समतोल असणे आवश्यक आहे. पुढील पिढ्यांच्या सुरक्षिततेसाठी गोव्यातील पवित्र नद्या, डोंगर, विस्तीर्ण समुद्रकिनारे आणि सुंदर गावे यांचे मूळ रूप जपून ठेवले पाहिजे."

मान्यवरांचा सत्कार आणि नियुक्तीपत्रे

मुख्य कार्यक्रमात गोव्याच्या विविध क्षेत्रांतील विकासात मोलाचा हातभार लावणाऱ्या ११ नामांकित व्यावसायिक, उद्योग आणि ब्रँड मालकांचा उपराष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. याच सोहळ्यात १२० नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षकांना (PSI) नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. याशिवाय, 'दीनदयाल स्वास्थ्य सेवा योजने'अंतर्गत (डीडीएसएसवाय) नागरिकांसाठी अतिरिक्त निधी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी केली.

हेही वाचा