‘हाय स्पीड’ डिझेलच्या मागणीत यावर्षी १६ टक्के वाढ

सर्वात जास्त मागणी दक्षिण गोव्यात

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
‘हाय स्पीड’ डिझेलच्या मागणीत यावर्षी १६ टक्के वाढ

पणजी : १ ते २८ मे या दरम्यान गोव्यात डिझेलच्या वापरात मोठी वाढ नोंद झाली आहे. राज्यात  हाय-स्पीड डिझेलची एकूण विक्री २४,५८५ किलोलिटर पर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षी या काळात २१,१६९ किलोलिटर एवढी होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी १६.१४ टक्क्यांची वाढ झाली आहे, अशी आकडेवारी तेल विपणन कंपन्यांनी जारी केली आहे. 

या आकडेवारीनुसार दक्षिण गोव्यात डिझेलच्या वापरात सर्वात जास्त १९.३६ टक्क्यांची वाढ नोंद होऊन विक्री ९,२५५ किलो लीटरवर पोहोचली आहे. जी गेल्या वर्षी ७,७५४ किलो लिटर होती. उत्तर गोव्यात गेल्या वर्षी १३,४१५ किलो लिटर विक्रीच्या तुलनेत यावर्षी १५,३३० किलो लिटर विक्री नोंद झाली आहे. ही आकडेवारी १४.२७ टक्क्यांची वाढ दर्शवते. 

शेवटच्या काही आठवड्यांत इंधनाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली तरी, सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्यांनी गोवा तसेच पूर्ण देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची अखंडीत पुरवठा करण्याचे आश्वासन ग्राहकांना दिले आहे, असे गोव्यातील तेल कंपन्यांचे राज्यस्तरीय समन्वयक मधुरेंद्र के. पांडे यांनी सांगितले.  

ग्रामीण भागात शेतीच्या कामामुळे ही मागणी वाढली आहे. सरकारी पंपांवर मिळत असलेल्या सवलतीमुळे ग्राहक इतर खाजगी पंपांवर जाण्याऐवजी सरकारी पंपांवर जात असतात. त्याशिवाय संस्थात्मक आणि व्यापारी ग्राहकही आता किरकोळ इंधन पंपांकडून इंधन खरेदी करायला लागल्याने ही अत‌िरिक्त मागणी वाढली असल्याची माहिती पांडे यांनी दिली. 

इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल आपल्या टर्मिनल्स, डेपो, पाईपलाईन, एलपीजी बॉटलींग प्लांट आणि रिटेल आऊटलेट्सच्या मोठ्या नेटवर्कच्या माध्यमातून इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवतात. इंधनाचा वेळेत पुरवठा व्हावा आणि पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक सुरळीत सुरू रहावी, यासाठी पुरवठा करणारे, वाहतूक यंत्रणा आणि टर्मिनल ऑपरेशन्स २४ तास काम करीत असतात, असे पांडे यांनी सांगितले. 

पूर्ण देशात पेट्रोल, ‌डिझेल आणि एलपीजीचा आवश्यक तेवढा साठा उपलब्ध आहे आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली आहेत. कुठलीच भीती न ठेवता नेहमीप्रमाणे इंधनाची खरेदी करावी. इंधनाच्या उपलब्धतेविषयी सत्य माहिती जाणून घेण्यासाठी ग्राहकांनी केवळ तेल कंपनी आणि अधिकृत यंत्रणांनी जारी केलेल्या सरकारी निवेदनावरच विश्वास ठेवावा, असे आवाहन पांडे यांनी केले आहे. 

हेही वाचा